For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Soybean Bajar Bhav: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाची लूट! सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी का? शेतकरी त्रस्त मात्र व्यापारी मस्त

12:42 PM Mar 02, 2025 IST | Krushi Marathi
soybean bajar bhav  सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाची लूट  सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी का  शेतकरी त्रस्त मात्र व्यापारी मस्त
soybean
Advertisement

Soybean Market Update:- सोयाबीन हे पीक भारतीय शेतकऱ्यांसाठी नवीन नसून, त्याच्या लागवडीचा प्रसार सुमारे ४५ वर्षांपूर्वी सुरू झाला. यामुळे सोयाबीन लागवडीची एक परंपरा निर्माण झाली असून, मागील दोन दशकांपासून हे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांसाठी आधार देणारे ठरले आहे. चालू वर्षात देशभरात ११८ ते २२० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असून, १२७ लाख टनांपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, कृषी विभाग आणि विविध संस्थांच्या अहवालांनुसार यावर्षी सोयाबीनच्या लागवडीत तसेच उत्पादनात काहीशी घट दिसून आली आहे.

Advertisement

खाद्यतेल क्षेत्रात सोयाबीनचे योगदान

Advertisement

तेलबिया उत्पादनात सोयाबीनचे योगदान मोठे असून, भारतातील सोयाबीन तेलाचा वाटा सुमारे ४२ टक्के आहे. खाद्यतेलाच्या एकूण वापरातही सोयाबीन तेलाचा वाटा २९ टक्क्यांच्या आसपास आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहता, राज्यात एकूण तेलबियांची ३१.३८ टक्के क्षेत्रावर लागवड केली जाते, त्यापैकी ९६.२१ टक्के क्षेत्र सोयाबीनच्या लागवडीखाली आहे.

Advertisement

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि गुजरात या कोरडवाहू व दुष्काळप्रवण राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते.

Advertisement

सोयाबीनच्या दरावर परिणाम करणारे घटक

Advertisement

सोयाबीनच्या दरावर परिणाम करणारे मुख्य घटक म्हणजे आर्द्रता (ओलावा), फॉरेन मॅटर (माती, कचरा, काडी, दगड) आणि डॅमेज (डागी, काळे पडलेले किंवा सुरकुत्या पडलेले दाणे). मात्र, दर ठरवताना शेतकऱ्यांच्या मेहनतीला फारसे महत्त्व दिले जात नाही. उत्पादन खर्च आणि कष्ट यांचा विचार केला जात नाही, तर फक्त गुणवत्तेनुसार बाजारभाव ठरवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने आपला माल विकावा लागतो.

सोयाबीन खरेदी केंद्रावरील जाचक अटी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्याच

शासनाने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात केली होती. फेब्रुवारीच्या सुरुवातीला ५६२ खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू होती. मात्र, या केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया वेळखाऊ आणि अटी जाचक असल्याचे आढळले. अनेक केंद्रांवर बारदान नसल्याने तसेच गोदाम रिकामे नसल्याने खरेदी केंद्रे बंद असल्याचे दिसून आले.

यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडेच कल दिला. शेतकऱ्यांकडील संपूर्ण सोयाबीनची विक्री होईपर्यंत सरकारी खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली, मात्र व्यवहारात ही मागणी मान्य झाल्याचे दिसून आले नाही.

सोयाबीनचा एकरी खर्च आणि मिळणारे उत्पन्न

सोयाबीनच्या लागवडीपासून बाजारपेठेत विक्री होईपर्यंत प्रती एकर सरासरी १८ ते २० हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि कुटुंबाच्या रोजंदारीचा खर्च समाविष्ट नाही. सोयाबीनचे प्रती एकर सरासरी उत्पादन पाच ते सहा क्विंटलपर्यंत होते. सध्या व्यापारी ३,८०० ते ४,२०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी १९,००० ते २५,००० रुपये उत्पन्न मिळते. मात्र, सरकारने जाहीर केलेला हमीभाव ४,८९२ रुपये प्रति क्विंटल असून, त्यानुसार एकरी जास्तीत जास्त २९,३५२ रुपये मिळू शकतात. खर्च वजा करता, सरकारी दरानुसार जास्तीत जास्त ९,००० रुपये आणि व्यापारी दरानुसार जास्तीत जास्त ५,००० रुपये नफा शेतकऱ्यांना मिळतो.

शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा याकरिता आवश्यक बाजारभाव

शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवण्यासाठी प्रती क्विंटल किमान ७,००० रुपये भाव मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून चांगला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. यामागे मोठ्या प्रमाणात विदेशातून होणारी आयात, व्यापारी लॉबी आणि मिल लॉबीचे हितसंबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाला न्याय मिळण्यासाठी सरकारने ठोस धोरण आखण्याची गरज आहे.