For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Shaktipeeth Mahamarg: रस्ता की संकट? महामार्गामुळे 48 पूल, 28 रेल्वे क्रॉसिंग आणि 30 डोंगर फोडले जाणार

11:53 AM Mar 11, 2025 IST | Krushi Marathi
shaktipeeth mahamarg  रस्ता की संकट  महामार्गामुळे 48 पूल  28 रेल्वे क्रॉसिंग आणि 30 डोंगर फोडले जाणार
shaktipeeth mahamarg
Advertisement

Shaktipeeth Mahamarg:- शेतकरी हमीभाव मागतो, पण सरकार तो देत नाही. सामान्य माणूस मूलभूत सुविधा मागतो, पण त्याच्या वाट्याला फक्त आश्वासन येतात. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेकदा चर्चा होते, पण ठोस उपाययोजना मात्र होत नाहीत. मात्र, या साऱ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार ८६ हजार कोटींच्या शक्तीपीठ महामार्गावर मात्र भरभरून खर्च करायला तयार आहे. हा प्रकल्प नक्की गरजेचा आहे का? की यात वेगळेच अर्थकारण दडले आहे?

Advertisement

सरकार महामार्ग उभारणीवर का बसले अडून?

Advertisement

राज्यातील एकाही भाविकाने मंदिरांकडे जाण्यासाठी रस्ता नाही, अशी तक्रार केलेली नाही. तरीही सरकार हा महामार्ग उभारण्यावर ठाम आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या प्रकल्पासाठी पैसा जागतिक बँकेचा असणार, त्याचा खर्च ठेकेदार उचलणार आणि टोल मात्र जनतेला भरावा लागणार. महामार्ग तयार झाल्यावर सरकार त्याचा विकासाचा डंका पिटणार, पण या रस्त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची शेती नष्ट होणार आहे. तब्बल २७,५०० एकर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार असून, ४८ ठिकाणी मोठे पूल, २८ रेल्वे क्रॉसिंग, ३० डोंगर फोडले जाणार आहेत. यामुळे ३८६ गावांचे अस्तित्व धोक्यात येईल.

Advertisement

या प्रकल्पाचे काम जाऊ शकते एक लाख कोटींपर्यंत

Advertisement

या प्रकल्पासाठी सुरुवातीला ८६,५०० कोटी रुपये खर्च होणार असले तरी, काम सुरू होईपर्यंत हा खर्च १ लाख कोटींपर्यंत पोहोचणार आहे. टोलच्या माध्यमातून पुढील ३० वर्षांत १० लाख कोटी रुपये वसूल करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी महामार्ग नको म्हणून विरोध करत असला, तरी आर्थिक गणिते पाहता सरकार त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. विशेषतः भुदरगड व आजरा तालुक्यातील पाण्याचे स्रोत नष्ट होणार आहेत. आंबोली घाटातून ३० किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी सह्याद्रीचा घाट फोडला जाणार आहे. परिणामी, तेथील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होईल.

Advertisement

हा महामार्ग तयार करण्याचे आहे का गरज?

हा महामार्ग तयार करण्याची गरजच नाही, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, जोतिबा, बाळूमामा मंदिर, नृसिंहवाडीचे दत्त मंदिर या ठिकाणी जाण्यासाठी आधीच उत्तम रस्ते उपलब्ध आहेत. पुणे-बेंगलुरू महामार्गाचे सहापदरीकरण सुरू आहे. रत्नागिरी-नागपूर मार्ग लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य मार्गांचे जाळेही भक्कम आहे. कोकणात जाण्यासाठी आधीच चार मोठे घाटरस्ते उपलब्ध आहेत. तरीही हा महामार्ग करण्यासाठी ६० गावांची जमीन बळकावली जाणार असेल, तर नागरिकांनी या निर्णयाविरोधात विचार केला पाहिजे.

वन्य प्राण्यांचा अधिवास नष्ट होण्याचा धोका

महामार्गाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे जंगलतोड आणि वन्यजीवांचे स्थलांतर. भुदरगड आणि आजरा हे पर्यावरणीय दृष्टिकोनातून संवेदनशील भाग आहेत. महामार्गाच्या बांधकामामुळे येथे राहणारे वन्यप्राणी सुरक्षित जागेच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये शिरतील, शेतपीक नष्ट करतील. सरकारच्या एसीत बसलेल्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य समजणार नाही, पण शेतकरी मात्र या संकटाला तोंड देणार.

या महामार्गामुळे कोथळी, दानोळी, निमशिरगाव, चिपरी, तारदाळ, हातकणंगले, तिळवणी, माणगाव, सांगवडे, निरळी, कणेरीवाडी, सोनाळी, आदमापूर, गारगोटी, पडखंबे, वेंगरूळ यांसारखी अनेक गावे बाधित होणार आहेत. अशा परिस्थितीत, हा महामार्ग गरजेचा आहे की नफ्यासाठी आखलेला डाव आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.