SBI Loan Scheme: विना गॅरंटी आणि कमी व्याजदरात कर्ज! SBI चे महिलांसाठी खास ‘अस्मिता’ लोन
SBI Loan Scheme:- भारतीय स्टेट बँकेने (SBI) आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 च्या निमित्ताने महिलांसाठी एक मोठी आर्थिक घोषणा केली आहे, जी विशेषतः महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ‘अस्मिता’ नावाने सादर करण्यात आलेली ही विशेष कर्ज योजना महिलांना कमी व्याजदरात आणि कोणत्याही प्रकारच्या गहाण (कॉलेटरल) शिवाय कर्ज मिळवण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. अनेक महिला व्यवसाय सुरू करू इच्छितात, परंतु सुरुवातीस भांडवलाच्या कमतरतेमुळे त्यांना अडचणी येतात. याच समस्येवर उपाय म्हणून SBI ने ही योजना सुरू केली आहे.
महीलांसाठी या योजनेचा फायदा
यामुळे महिला स्वतःचा उद्योग किंवा स्टार्टअप सहजपणे सुरू करू शकतील. याचबरोबर, SBI ने ‘नारी शक्ती’ प्लॅटिनम डेबिट कार्ड देखील सादर केले आहे. हे विशेषतः महिलांसाठी डिझाइन केलेले कार्ड आहे, ज्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या सवलती आणि फायदे मिळणार आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार, या कार्डच्या माध्यमातून महिलांना शॉपिंग, प्रवास, विमा आणि इतर अनेक आर्थिक सेवांवर विशेष सूट मिळेल.
SBI चे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी या नव्या योजनेबाबत बोलताना सांगितले की, या विशेष ऑफरमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठा आधार मिळेल आणि त्यांना अधिक सोप्या अटींवर कर्ज मिळेल. तर SBI चे व्यवस्थापकीय संचालक विनय टोन्स यांनी या नव्या योजनांना तांत्रिक नवकल्पना आणि सामाजिक समानतेचे प्रतीक म्हणून संबोधले आहे.
महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेली भांडवल मदत देण्याबरोबरच, SBI या माध्यमातून डिजिटल व्यवहारांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘नारी शक्ती’ कार्डमुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये अनेक सोयी मिळणार असून, सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.
बँक ऑफ बडोदाची महिलांसाठी खास योजना
दरम्यान, फक्त SBI नव्हे, तर बँक ऑफ बडोदाने (BOB) देखील महिलांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे. भारतीय वंशाच्या परदेशस्थ महिलांसाठी ‘बॉब ग्लोबल वुमन्स एनआरई आणि एनआरओ सेव्हिंग्ज अकाउंट’ सुरू करण्यात आले आहे. या नव्या खात्याच्या माध्यमातून महिला ग्राहकांना ठेवींवर अधिक व्याजदर, गृहकर्ज आणि वाहन कर्जावर कमी प्रोसेसिंग शुल्क तसेच लॉकरच्या भाड्यावर विशेष सूट मिळणार आहे.
याशिवाय, या खात्याद्वारे महिलांना कस्टमाइज्ड डेबिट कार्ड, वाढीव व्यवहार मर्यादा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ लाउंजमध्ये मोफत प्रवेश, सुरक्षित ठेव लॉकरची विनामूल्य सेवा आणि हवाई अपघात विमा संरक्षण यांसारख्या अनेक फायदेशीर सुविधा उपलब्ध होतील.
SBI आणि BOB या दोन्ही सरकारी बँकांनी महिला सशक्तीकरणासाठी उचललेली ही पावले निश्चितच स्तुत्य आहेत. या योजनांमुळे महिला उद्योजकांना भांडवलाच्या अडचणींवर मात करता येईल आणि त्या स्वतःचा उद्योग सुरू करून आत्मनिर्भर होऊ शकतील. विशेषतः, MSME क्षेत्रातील महिला व्यावसायिकांना या कर्ज योजनांचा मोठा फायदा होणार आहे.
शिवाय, ‘नारी शक्ती’ डेबिट कार्डसारख्या योजना महिलांना डिजिटल व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणि सुलभता देणार आहेत. सरकारच्या आणि बँकिंग क्षेत्रातील या उपक्रमांमुळे महिलांचे आर्थिक सशक्तीकरण अधिक गती घेईल आणि त्या स्वतंत्रपणे आपल्या उद्योग क्षेत्रात पुढे जाऊ शकतील. त्यामुळे अशा योजना महिला उद्योजकांसाठी संजीवनी ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.