RIL Reliance Share: 10 रुपयांना खरेदी केलेले रिलायन्स शेअर्स आज झाले 12 लाखांचे… चमत्कार की गुंतवणूक?
RIL Reliance Share:- शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे नेहमीच जोखमीचे असते. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराला नियम आणि अटी लक्षपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारात मोठ्या चढ-उतारांची नोंद झाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या अस्थिरतेमुळे शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे, तर काहीजण अजूनही नफा कमावण्याच्या संधी शोधत आहेत. अशा परिस्थितीत चंदीगडमधील एका व्यक्तीवर मात्र नशिबाची मोठी साथ लाभली. साध्या साफसफाईच्या निमित्ताने त्यांच्या हाती असे काही लागले की, त्यामुळे त्यांचे नशीबच बदलून गेले.
रतन ढिल्लों बाबतीत घडली अनोखी घटना
ही घटना रतन ढिल्लों यांच्या बाबतीत घडली. कारची आवड असलेल्या ढिल्लों यांनी एके दिवशी आपल्या घरात साफसफाई करताना काही जुनी कागदपत्रे सापडली. ती पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. या कागदपत्रांमध्ये 1988 मध्ये खरेदी केलेले रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे 30 शेअर्स होते. त्यावेळी या शेअर्सची किंमत केवळ 10 रुपये प्रति शेअर इतकी होती.
हे शेअर्स ज्या व्यक्तीने खरेदी केले होते ती व्यक्ती आता हयात नव्हती, त्यामुळे या कागदपत्रांचे महत्त्व यापूर्वी कोणालाही लक्षात आले नव्हते. मात्र, ढिल्लों यांनी जेव्हा ही कागदपत्रे पाहिली, तेव्हा त्यांना याबाबत अधिक माहिती घेण्याची इच्छा झाली.
सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर शेअर केली माहिती
शेअर बाजाराविषयी फारशी माहिती नसल्यामुळे ढिल्लों यांनी ही माहिती सोशल मीडियावर X (माजी ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर शेअर केली आणि यापुढे काय करावे, याबाबत इतरांकडून मार्गदर्शन मागितले. त्यांच्या या पोस्टने लगेचच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आणि काही तासांतच ती व्हायरल झाली. शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्या आणि अनुभवी नेटकऱ्यांनी त्यांची ही माहिती पडताळून पाहिली.
त्यांनी सांगितले की, गेल्या 36 वर्षांमध्ये रिलायन्सच्या शेअर्समध्ये तीन स्टॉक स्प्लिट (शेअर्सचे विभाजन) आणि दोन बोनस इश्यू झाले आहेत. या बदलांमुळे त्या 30 शेअर्सची संख्या आणि किंमत प्रचंड वाढली आहे. सध्या रिलायन्सच्या एका शेअरची किंमत सुमारे 960 रुपये आहे. त्यामुळे ढिल्लों यांच्याकडील शेअर्स आता 11 ते 12 लाख रुपये मूल्याचे झाले आहेत.
काही नेटकऱ्यांनी ढिल्लों यांना या शेअर्सची कागदपत्रे पडताळून त्यांना अधिकृतरित्या डिमॅट (Demat) खात्यात ट्रान्सफर करून घेण्याचा सल्ला दिला. हे शेअर्स डिजिटल स्वरूपात स्थानांतरित केल्यानंतर त्यांना सहजपणे विकता येईल किंवा भविष्यात अधिक नफा मिळवण्यासाठी ठेवता येईल. अनेकांनी ढिल्लों यांना या संधीचा योग्य लाभ घेण्याचा सल्ला दिला आहे.
या घटनेमुळे रतन ढिल्लों यांचे नशीबच पालटले. एक साधी साफसफाई त्यांच्या जीवनात असा मोठा आर्थिक लाभ घेऊन येईल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. यामुळे गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित होते. एखादी छोटीशी गुंतवणूकही काळानुसार मोठा लाभ देऊ शकते, हे या घटनेने सिद्ध केले. आता सर्वांची उत्सुकता यावर केंद्रित आहे की, रतन ढिल्लों या अचानकपणे मिळालेल्या मिळकतीचा कसा उपयोग करतात.