कर्जबाजारी शेतकऱ्याने शेती विकली.. आज तोच शेतकरी बनला महाराष्ट्राचा Smart शेतकरी! वाचा संघर्षकथा
Farmer Success Story:- विदर्भ हा शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यात कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आपले जीवन संपवतात. मात्र याच जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे शेती साम्राज्य उभे केले आहे.
यवतमाळचे प्रगतशील शेतकरी सुभाष शर्मा हे नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान अवलंबून आज संपूर्ण देशभर ओळखले जात आहेत. त्यांच्या बहुपीक शेती पद्धतीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि त्यांनी साडेतीन लाख शेतकऱ्यांना आधुनिक व नैसर्गिक शेतीचे धडे दिले आहेत.
कर्जाच्या मोठा डोंगर असताना नाही मानली हार
सुभाष शर्मा यांच्यावर कर्जाचा मोठा भार होता. मात्र, कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मते संकटांवर उपाय शोधला तर तो यशाकडे नेतो. पण त्यापासून पळवाट काढली तर तो विनाशाचा मार्ग ठरतो. त्यांनी हीच गोष्ट मनाशी पक्की केली आणि आत्महत्येचा विचार कधीच केला नाही.
त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे डोरली गावात वडिलोपार्जित 16 एकर शेती होती. वडिलांकडून शेतीचे सर्व कौशल्य आत्मसात केल्यानंतर काही कारणांमुळे त्यांना ही जमीन विकावी लागली. त्या पैशातून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा 16 एकर जमीन विकत घेतली. मात्र त्यावेळी इतर कर्जाचा डोंगर डोक्यावर होता आणि आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती.
असे वळले नैसर्गिक शेतीकडे
रासायनिक शेतीत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने त्यांना शेतीतून फारसा फायदा झाला नाही. याच काळात त्यांनी जगप्रसिद्ध नैसर्गिक शेती तज्ज्ञ मासानोबू फूकुओका आणि भास्कर सावे यांच्या शेती पद्धतींचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी आपल्या शेतात नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला.
सर्वप्रथम त्यांनी शेतातील पाण्याची योग्य व्यवस्था केली आणि जमिनीचा कस सुधारण्यासाठी बोरू, चवळी, बाजरी यासारखी हिरवळीची पिके घेतली. त्यांनी आपल्या शेतात तूर, हरभरा, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, वाल, हळद, वांगे, मेथी यासारखी विविध पिके घेतली. याशिवाय, कडुलिंब आणि सीताफळाच्या झाडांची लागवड केली. ज्यामुळे पक्ष्यांचे नैसर्गिक ये जा वाढली आणि किडींचे नियंत्रण आपोआप झाले.
गोसंवर्धनाला दिले महत्त्व
शेतीत समृद्धी मिळवण्यासाठी त्यांनी चार महत्त्वाचे घटक – पाणी, खत, बियाणे आणि नियोजन यांचा योग्य मेळ साधला. त्यांच्या मते नैसर्गिक शेतीत गोसंवर्धन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. माती सशक्त झाली तर उत्पादन नक्कीच चांगले मिळते असे ते सांगतात.
आजपर्यंत सुभाष शर्मा यांनी साडेतीन लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मेहनतीची आणि शेतीतील यशाची दखल घेत 2019 मध्ये त्यांना "महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशाची ही प्रेरणादायी कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरते.