Tourist Place: कोकणातील निसर्गाचा जादुई चमत्कार! हे भेट दिवसातून फक्त 30 मिनिटे दिसते आणि मग गायब होते.. जाणून घ्या गुपित
Maharashtra Tourism:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अथांग समुद्रकिनारे, घनदाट नारळी-सुपारीच्या बागा, नितळ निळेशार पाणी आणि निसर्गाची अप्रतिम सृष्टी यामुळे कोकणातील अनेक ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग समुद्र किनारा हे असेच एक निसर्गरम्य ठिकाण असून, येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘संगम सिगल बेट’. या बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बेट दिवसातून केवळ 30 मिनिटांसाठीच पाण्यावर तरंगते आणि नंतर समुद्राच्या लाटांमध्ये अदृश्य होते.
‘संगम सिगल बेट’ची वैशिष्ट्ये आणि निर्मिती
देवबाग समुद्र किनाऱ्यावर कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. यामुळे येथे एका नैसर्गिक बेटाची निर्मिती झाली आहे, ज्याला ‘संगम सिगल बेट’ असे म्हणतात. विशेष म्हणजे हे बेट संपूर्ण दिवसभर दिसत नाही. भरतीच्या लाटांमुळे हे बेट केवळ 30 मिनिटांसाठी उघडते आणि नंतर समुद्रात विलीन होते. त्यामुळे येथे जाण्यासाठी आणि बेट पाहण्यासाठी अचूक वेळ साधणे गरजेचे असते.
हे बेट अत्यंत शांत आणि सुंदर आहे. येथे उभे राहिल्यास एकीकडे प्रवाही कर्ली नदी आणि दुसरीकडे अथांग अरबी समुद्र असा दुहेरी नजारा पाहायला मिळतो. पांढऱ्या शुभ्र वाळूने भरलेले हे बेट निसर्गप्रेमींना आणि छायाचित्रकारांना आकर्षित करते. त्याचा अनुभव घेताना असे वाटते की जणू काही आपण समुद्राच्या मध्यभागी उभे आहोत.
संगम सिगल बेट कधी आणि कसे पाहता येईल?
जर तुम्हाला हे अनोखे निसर्गाचे चमत्कारिक रूप अनुभवायचे असेल, तर योग्य वेळी येथे पोहोचणे अत्यावश्यक आहे. भरतीच्या लहरींवर अवलंबून असल्यामुळे सकाळी किंवा दुपारी ठराविक वेळेतच हे बेट पाहता येते. त्यामुळे येथे जाण्यापूर्वी स्थानिक बोटचालकांकडून भरती-ओहोटीची वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तिथे जाण्यासाठी काही मार्ग
रेल्वेने प्रवास करायचा असल्यास, कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. तेथून पुढे बस किंवा खासगी वाहनाने मालवण गाठता येते.बससेवा उपलब्ध असून, मुंबई, पुणे आणि गोवा येथून थेट मालवणसाठी एस.टी. आणि खासगी बस उपलब्ध आहेत.बोटीने बेटावर जाता येते. मालवणपासून 12 किलोमीटर आणि तारकर्लीपासून 6 किलोमीटर अंतरावर देवबाग समुद्र किनारा आहे. येथून बोटीने संगम सिगल बेटावर जाता येते.
संगम सिगल बेटावर काय अनुभवता येईल?
जेव्हा भरती ओसरते आणि हे बेट दिसू लागते, तेव्हा त्याचा नजारा मंत्रमुग्ध करणारा असतो. या बेटावर उभे राहिल्यास नदी आणि समुद्राच्या मिलनाचा अनोखा अनुभव मिळतो. पांढऱ्या वाळूचा किनारा, निळेशार पाणी आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न होते. अनेक पर्यटक येथे येऊन हे वैशिष्ट्यपूर्ण बेट पाहण्यासाठी प्रतीक्षा करतात.
हे बेट काही वेळाने पुन्हा समुद्राच्या लाटांमध्ये विलीन होते आणि जणू काही कधी अस्तित्वातच नव्हते असे वाटते. अवघ्या काही मिनिटांसाठी दिसणारे हे बेट म्हणजे निसर्गाची एक जादूच आहे. त्यामुळे या चमत्कारिक ठिकाणाला भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी खास ठिकाण
कोकण म्हणजे निसर्गाचा खजिना, आणि देवबाग समुद्र किनारा त्यातील एक अनमोल रत्न आहे. निसर्गाचा अद्भुत खेळ पाहू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी संगम सिगल बेट हे एक अनोखे आणि विस्मयकारक ठिकाण आहे. जर तुम्ही कोकणच्या सफरीवर असाल, तर या 30 मिनिटांसाठी अस्तित्वात असणाऱ्या बेटाचा अनोखा अनुभव नक्की घ्या.