प्रजासत्ताक दिनी ‘हा’ प्रकल्प वाहतूकीसाठी 100% होणार खुला! मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास फक्त 12 मिनिटात होणार पूर्ण
Coastal Road:- मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या प्रचंड प्रमाणात दिसून येते. अगदी काही किलोमीटरचा प्रवास करायला तासाभराचा कालावधी देखील लागतो व त्यामुळे मुंबईकर वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक प्रकल्पांची कामे मुंबईमध्ये सुरू आहेत.
त्यातील काही प्रकल्पांची कामे पूर्ण होण्याच्या दिशेने असून काही प्रकल्पांची कामे सुरू करण्यात आलेले आहेत.यामध्ये जर आपण मुंबई पालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणारा कोस्टल रोड बघितला तर 14000 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या कोस्टल रोडचे पूर्ण काम आता झाले असून याची जोडणी वांद्रे सी लिंकला केली जाणार आहे.
हा कोस्टल रोड आता 26 जानेवारी पासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार असून यामुळे आता वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवास फक्त बारा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे व त्यामुळे तब्बल प्रवाशांचा 50 मिनिटांचा वेळ या माध्यमातून वाचणार आहे व वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.
कसा होणार मुंबईकरांना कोस्टल रोडचा फायदा?
हा कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंक असा 10.58 किमी लांबीचा बांधण्यात आला असून या मार्गाला आता पुढे साडेचार किमी लांबीचा वांद्रे वरळी सी लिंक कनेक्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आता वांद्रे ते मरीन ड्राईव्ह प्रवासासाठी 50 मिनिटांऐवजी फक्त बारा मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
वांद्रे ते मरीन ड्राईव्ह हे पंधरा किलोमीटरचे अंतर आहे.या मार्गावर स्पीड लिमिट 80 ते 100 किलोमीटर ठेवण्यात आले आहे.या कोस्टल रोडच्या सभोवती अनेक सुविधा देखील उभारण्यात आलेला आहेत.
यामध्ये फुलपाखरू उद्यान, मुलांसाठी मैदाने तसेच घसरगुंडी,सी सॉ फळी तसेच झोके असणार आहेत व या कोस्टल रोडला समांतर साडेसात किमी लांबीचा फुटपाथ देखील बांधण्यात येणार आहे.
हा फुटपाथ प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी फेस पर्यंत असणार आहे. तसेच भूमिगत पार्किंगची सुविधा उभारण्यात आली असून महालक्ष्मी मंदिर तसेच हाजी अली या ठिकाणी बाराशे, वरळी सी फेस येथे 400 तर अमर सन्स येथे 256 वाहने उभे राहू शकतील इतक्या क्षमतेची पार्किंग देखील उभारण्यात येणार आहे.
सगळ्याच महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर प्रवासी आणि वाहनांना सुरक्षित रित्या बाहेर काढता यावे याकरिता न्यू ऑस्ट्रेयन टनेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून बोगदे तयार करण्यात आलेले आहेत. ही बोगदे स्वयंचलित नियंत्रण तसेच कंट्रोल रूम्स व पोलीस यासारख्या यंत्रणांशी कनेक्ट असणार आहेत.