सावधान! तुमच्या गाई-म्हशींना देखील होऊ शकतो कॅन्सर… Cancer च्या बचावासाठी ‘ही’ खबरदारी घ्या
Animal Care:- गेल्या काही वर्षांत जनावरांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वी हा आजार दुर्मिळ मानला जात असे, मात्र आता गायी, म्हशी, बैल तसेच पाळीव कुत्र्यांमध्येही कॅन्सरचे प्रमाण वाढल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी ही गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कर्करोग झाल्यास जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते.त्यांची शारीरिक स्थिती खालावते आणि काही प्रकरणांमध्ये मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी योग्य वेळी सावध होऊन आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
जनावरांमध्ये होणाऱ्या कॅन्सरचे प्रकार
जनावरांमध्ये कॅन्सरचे दोन प्रमुख प्रकार दिसून येतात. बेनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. बेनाईन ट्यूमर तुलनेने कमी घातक असतो.मात्र मॅलिग्नंट ट्यूमर शरीरभर झपाट्याने पसरतो आणि गंभीर हानी पोहोचवतो.
अशा प्रकारच्या कर्करोगावर वेळीच उपचार न केल्यास जनावर मृत्युमुखी पडू शकते. त्यामुळे पशुपालकांनी त्यांच्या जनावरांमध्ये काही विशिष्ट बदल दिसताच तातडीने पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कॅन्सर झाल्यास जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे
कॅन्सर झाल्यास जनावरांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. जनावराच्या शरीरावर गाठ किंवा सूज दिसणे, वजन झपाट्याने कमी होणे, खाण्याची इच्छा नष्ट होणे, अशक्तपणा जाणवणे आणि श्वास घेण्यास अडचण येणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत. अशा स्थितीत प्राण्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
पशुपालकांनी खालील प्रकारे काळजी घ्यावी
जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पशुपालकांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी. जनावरांना पौष्टिक आहार देणे अत्यंत गरजेचे आहे. हिरवा चारा, योग्य प्रमाणात खनिजे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्यक आहे. अनेक वेळा जनावरे उकिरड्यावर चरण्यासाठी जातात आणि प्लास्टिक किंवा इतर घातक पदार्थ खातात.
त्यामुळे त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे जनावरांना स्वच्छ ठिकाणी ठेवणे आणि त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय जनावरांच्या शिंगांना रंग लावण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र त्यामधील रसायने त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे हे टाळावे.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी नियमित संपर्क ठेवणे आणि वेळोवेळी जनावरांची वैद्यकीय तपासणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा सुरुवातीच्या टप्प्यावर कर्करोगाचे निदान होऊ शकते. त्यामुळे लवकर उपचार घेतल्यास प्राण्याचे प्राण वाचवता येऊ शकतो.
शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची योग्य निगा राखली आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर मोठ्या प्रमाणात नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे वेळीच योग्य उपचार आणि खबरदारी घेतल्यास जनावरांचे दीर्घायुष्य राखता येईल आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येईल.