Farmer Success Story: वयाच्या 16 व्या वर्षी केली शेतीला सुरुवात, आज आहे शंभर एकराचा मालक! वाचा या जिद्दी शेतकऱ्याची कहाणी
Success Story:- सध्याच्या काळात अनेक लोक शेती परवडत नाही असे म्हणतात.मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनाच्या मदतीने चांगले उत्पन्न मिळू शकते.हे काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील शेतकरी कृष्णराव देशट्टीवार यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर शेती व्यवसायात यशस्वी घोडदौड केली आहे. त्यांनी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळत फळबाग केंद्रित शेतीचा (Horticulture Farming) यशस्वी प्रयोग केला आणि आता त्यांची वार्षिक उलाढाल 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
शेतीचा प्रवास आणि संघर्ष
खैरगाव देशमुख या गावातील 70 एकर वडिलोपार्जित शेती सांभाळण्याची जबाबदारी कृष्णराव यांच्यावर अवघ्या 16 व्या वर्षी आली. जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यांना त्यांच्या काकांचा आधार मिळाला.
मात्र काही वर्षांनी काकांचीही साथ सुटली आणि संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी पारंपरिक पद्धतीने कापूस, तूर, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेत शेतीतून उत्पन्न मिळवायला सुरुवात केली. मेहनतीच्या बळावर त्यांनी 30 एकर जमीन विकत घेतली आणि आज त्यांच्याकडे 100 एकर शेती आहे.
फळबाग शेतीकडे वाटचाल
2009 पासून कृष्णराव यांनी पारंपरिक शेतीऐवजी फळबाग केंद्रित शेतीकडे लक्ष दिले. त्यासाठी ठिंबक सिंचन प्रणाली उभारली आणि संपूर्ण शेती पाण्याच्या काटकसरीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केली. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता आले. त्यांनी दरवर्षी 15 ते 20 हजार रुपयांचे शेणखत वापरण्यास सुरुवात केली आणि जमिनीची सुधारणा केली.
बहुपीक शेती आणि उत्पादन
फळबाग शेतीसाठी त्यांनी लिंबू, पेरू, केळी, कलिंगड या पिकांची निवड केली. कारण या पिकांना तुलनेने कमी मेहनत लागते आणि उत्पन्न भरपूर मिळते.
लिंबू पिकाचा विशेष फायदा – लिंबू हे वर्षभर उपलब्ध असलेले पीक आहे. बिगर हंगामात 25 रुपये प्रति किलो दर तर उन्हाळ्यात 60 रुपये प्रति किलो इतका दर मिळतो.
पेरू – 500 झाडांवर प्रती झाड 40 किलो उत्पादन मिळते, ज्याला 20 रुपये प्रति किलो दर मिळतो.
केळी – 1500 झाडांवर प्रत्येकी 28 किलो वजनाचे घड तयार होतात.
कलिंगड – एका एकरात 15 ते 28 टन उत्पादन मिळते.
कापूस – एकरी 15 क्विंटल उत्पादन मिळते.
गहू – एकरी 12 क्विंटलपर्यंत उत्पादन
तूर – एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन
याशिवाय त्यांनी अंजीर, फणस, आंबा, मोसंबी, नारळ यांची प्रत्येकी 20 झाडांची लागवड केली आहे. त्यातून देखील चांगले उत्पन्न मिळत आहे.
शेतीतून मोठे आर्थिक यश
या बहुपीक शेतीमुळे कृष्णराव देशट्टीवार यांची वार्षिक उलाढाल 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यशस्वी शेती प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे 2019-20 मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून इस्रायल दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली. यवतमाळ जिल्ह्यातून निवड झालेले ते एकमेव शेतकरी होते.