रांगेची झंझट नाही, रेल्वेचे तिकीट सहज मिळवा! UTS अँप वापरा आणि एका क्लिकवर तिकीट मिळवा.. मिळेल बोनसचा फायदा
Railway Ticket App:- रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांसाठी स्टेशन्सवर लांबच लांब रांगा लागत असतात. वेळेची बचत करण्यासाठी आणि गर्दीच्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘यूटीएस ऑन मोबाइल’ (UTS on Mobile) हे अत्याधुनिक तिकीट बुकिंग ॲप सुरू केले आहे. या ॲपचा वापर करून प्रवासी कुठूनही, कधीही अनारक्षित तिकीट काढू शकतात. विशेष म्हणजे, या माध्यमातून तिकीट बुकिंग केल्यास तुम्हाला तीन टक्के बोनसही मिळतो!
भुसावळ विभागातील हजारो प्रवाशांचा ‘यूटीएस ऑन मोबाइल’ ॲपला उत्स्फूर्त प्रतिसाद
रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये या डिजिटल सुविधेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जानेवारी महिन्यात २.५७ लाख प्रवाशांनी या ॲपचा वापर करून तिकीट काढले, ज्यामुळे भुसावळ विभागाला ६६.२२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. त्यामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर रेल्वेलाही तिकीट विक्रीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा फायदा होत आहे.
‘यूटीएस ऑन मोबाइल’ ॲपमुळे मिळणाऱ्या सुविधा
अनारक्षित तिकीट बुकिंग: या ॲपद्वारे लोकल, पॅसेंजर आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी अनारक्षित तिकीट सहज बुक करता येते.
मासिक सीझन तिकीट (MST) जारी व नूतनीकरण: प्रवाशांना मासिक पास नूतनीकरणासाठी स्टेशन्सवर जाण्याची गरज नाही. ते थेट मोबाईलवरच करता येते.
पेपर आणि पेपरलेस तिकीट पर्याय: पर्यावरणपूरक प्रवासासाठी डिजिटल तिकीट उपलब्ध, तसेच हवे असल्यास प्रिंटदेखील काढता येते.
आर-वॉलेट (R-Wallet) व्यवस्थापन: यामध्ये तिकीट बुकिंगसाठी प्रीपेड वॉलेट सुविधा मिळते, तसेच तीन टक्के बोनस देखील मिळतो.
तिकीटांचा तपशील व परतावा: बुक केलेली तिकिटे, वापराची माहिती आणि रद्द केलेल्या तिकिटांवरील परताव्याची स्थिती सहज तपासता येते.
यूटीएस ॲपचा वापर कसा करावा?
ॲप डाऊनलोड करा:
Android साठी Google Play Store, iPhone साठी Apple App Store आणि Windows साठी Windows Store वरून ‘UTS on Mobile’ ॲप डाउनलोड करा.
नोंदणी करा:
मोबाईल नंबर वापरून साइन अप करा आणि खाते तयार करा.
लॉगिन करून आर-वॉलेट रिचार्ज करा:
बुकिंग करण्यासाठी रेल्वेच्या आर-वॉलेटमध्ये पैसे टाका. येथे तुम्हाला रिचार्जवर तीन टक्के बोनस दिला जातो.
तिकीट बुक करा:
तुमच्या प्रवासाच्या मार्गानुसार तिकीट निवडा आणि पेमेंट करून तिकीट बुक करा.
‘यूटीएस ऑन मोबाइल’ का आहे सर्वोत्तम पर्याय?
रांगेत उभे राहण्याचा त्रास नाही – तिकीट सहज उपलब्ध,वेळेची मोठी बचत – स्टेशनवर वेळ घालवण्याची गरज नाही,पर्यावरणपूरक तिकीट बुकिंग – पेपरलेस तिकीट पर्याय, डिजिटल पेमेंट सुविधा – QR कोड, UPI, नेट बँकिंग यांचा वापर,बोनस स्कीम – आर-वॉलेटमध्ये रिचार्ज केल्यावर ३% बोनस इत्यादी फायदे मिळतात.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या डिजिटल सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या ॲपचा उपयोग अधिकाधिक नागरिकांनी केल्यास स्टेशनवरील गर्दी कमी होईल, वेळेची बचत होईल आणि प्रवास अधिक सुकर बनेल. तुमच्या मोबाईलवर ‘यूटीएस ऑन मोबाइल’ ॲप डाऊनलोड करा आणि प्रवास अधिक सोयीस्कर बनवा.