रब्बी हंगामात मक्याची पेरणी करणार आहात ? मग या सुधारित जातींची पेरणी करा, 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार !
Rabbi Season : सध्या संपूर्ण देशभर रब्बी हंगामाची धामधूम सुरू आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा सारख्या मुख्य पिकांची पेरणी केली जात आहे. यासोबतच रब्बीमध्ये अनेक शेतकरी बांधव मक्याची देखील पेरणी करतात. यंदाही रब्बी हंगामामध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी होणार आहे.
राज्यातही रब्बी हंगामातील मका लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत आज आपण रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असणाऱ्या मक्याचा काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामात मक्याची पेरणी ही 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीत केल्यास अधिक चे उत्पादन मिळवता येते. मक्याची लागवड ही सरीवरंबा पद्धतीने करावी जेणेकरून उत्पादन अधिक मिळेल.
याशिवाय कृषी तज्ञांनी उशिरा आणि मध्यम कालावधीत परिपक्व होणाऱ्या जाती ७५ सें.मी. x २० सें.मी. अंतरावर टोकण करण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच जे शेतकरी बांधव लवकर पक्व होणाऱ्या जातींची लागवड करणार असतील त्यांनी ६० सें.मी. x २० सें.मी. अंतरावर टोकण करावी.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बियाण्यांचे प्रमाण हे योग्य असणे आवश्यक आहे. बियाण्यांचे प्रमाण १५ ते २० किलो/हेक्टरी ठेवल्यास शेतकऱ्यांना नक्कीच चांगला उतारा मिळणार आहे. आता आपण मक्याच्या सुधारित जाती जाणून घेऊयात.
मक्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
राजर्षी : रब्बी हंगामात मका पेरणीचा विचार असेल तर राजर्षी या जातीची तुम्ही निवड करू शकता. या जातीचा पीक परिपक्व कालावधी १००-११० दिवस एवढा आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही महाराष्ट्रात उत्पादित होणारी एक प्रमुख संकरित जात आहे. संकरित जात असल्याने शेतकऱ्यांना यापासून चांगले उत्पादन मिळते. या जातीपासून शेतकऱ्यांना ५५ ते ६० क्विंटल प्रति हेक्टर पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
मांजरी : मक्याचा हा वाण रब्बी हंगामात लागवडीसाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी ९०-११० दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळते. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीपासून शेतकरी बांधव ४० ते ५० क्विंटल/हे. एवढे दर्जेदार उत्पादन मिळवू शकतात.
करवीर : करवीर या जातीची देखील महाराष्ट्रात लागवड होते. राज्यातील अनेक भागांमध्ये या जातीच्या मक्याची मोठ्या प्रमाणात शेती होत असल्याचे आढळून आले आहे. या जातीचा पीकपरिपक व कालावधी हा १००-११० दिवस आहे. उत्पन्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या जातीपासून ४० ते ५० क्विंटल/हे पर्यंतचे उत्पादन मिळते.
डेक्कन : ही देखील मक्याची एक सुधारित जात आहे. हा संकरित वाण राज्यातील अनेक भागांमध्ये लोकप्रिय आहेत. 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक तयार होते आणि हेक्टरी 55 ते 60 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देण्याची क्षमता या जातीची आहे.