पुण्याच्या शेतकरी दांपत्याचा नादखुळा ! 2 लाखाचा खर्च करून एका एकरात मिळवल 8 लाखांचे उत्पन्न, जांभळ्या वांग्याच्या शेतीने बनवलं लखपती
Pune Successful Farmer : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक बनलाय. काही प्रसंगी शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही तर काही प्रसंगी उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. यामुळे अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेतीसाठी धजावत नसल्याची वास्तविकता आहे.
पण परिस्थिती कितीही बिकट असली तरी देखील काही शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती मधून लाखो रुपयांची कमाई काढतायेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका शेतकरी जोडप्याने देखील शेतीमध्ये असाच एक नवीन प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न मिळवले आहे.
या शेतकरी जोडप्याने जांभळ्या वांग्याच्या लागवडीतून फक्त एकरभर जमिनीतुन लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. दौंड तालुक्यातील प्रशांत आणि प्रिया जगताप या शेतकरी जोडप्याने ही किमया साधली आहे. एकीकडे शेती मधून पोटाची खळगी भरून एक रुपया सुद्धा उरत नाही अशी ओरड होत असताना या शेतकरी दांपत्याने अवघ्या एक एकर जमिनीतून आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे.
यामुळे पंचक्रोशीत या शेतकरी दांपत्याची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या एक एकर जमिनीवर जांभळ्या वांग्याची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. शहरातील हॉटेल्समध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या वांग्याला प्रचंड मागणी आहे.
या वांग्याची बाजारात 15 ते 25 रुपये प्रतिकिलो अशी किंमत आहे. इतर वांग्यांच्या तुलनेत त्याची चव वेगळी असल्याने, त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. तसेच याला चांगला भावही मिळत असल्याने या प्रयोगशील शेतकरी जोडप्याला यातून चांगली कमाई झाली आहे.
जगताप यांनी लागवड केलेल्या एक एकर जमिनीतून त्यांना जवळपास 50 टन एवढे वांग्याचे उत्पादन मिळणार असून यातून त्यांना खर्च वजा जाता आठ लाख रुपयांची कमाई होणार आहे. सध्या जसा बाजार भाव आहे तसाच बाजार भाव आगामी काही दिवस कायम राहिला तर त्यांना आठ लाखांचे उत्पन्न सहज मिळणार असे दिसते.
खरं पाहता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा एक बागायती तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची शेती होते. ऊस लागवडीसाठी हा तालुका प्रसिद्ध आहे, पण जगताप कुटुंबाने भाजीपाला शेतीत देखील आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या 19 एकर शेतात त्यांनी उसासोबत पालेभाज्या आणि फळबाग लागवड केली आहे.
त्यांनी 3,200 जांभळ्या वांग्याची रोप नारायणगाव येथून 7 रुपयांप्रमाणे खरेदी केली होती. अन रोप लागवड केल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन, केले, सिंचनाची सोय केली अन या शेतकरी जोडप्याला चांगलं उत्पन्न मिळालंय. म्हणून या शेतकरी जोडप्याच्या या प्रयोगाची सध्या चर्चा सुरु आहे.