पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती, ‘या’ तीन टप्प्यासाठी आर्थिक निविदा खुल्या!
Pune Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी हा एक मोठा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्यात सर्वदूर रस्त्यांचे नेटवर्क वाढवले जात आहे.
सध्या राज्यात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यातील काही प्रकल्पांची कामे अत्यंत टप्प्यात पोहोचली आहेत. समृद्धी महामार्गाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे आणि असे असतानाच आता पुणे रिंग रोड प्रकल्पाला गती दिली जात आहे.
मंडळी या प्रकल्पाचे काम दोन भागात केले जाणार असून एकूण १२ टप्प्यांत होणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात होणार आहे. या दोन्ही भागांचे काम एकूण 12 टप्प्यात होणार असून या 12 पैकी नऊ टप्प्यांतील कामासाठी निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात आली आहेत.
दरम्यान आता बाकी राहिलेल्या तीन टप्प्यातील कामासाठीच्या टेंडर प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. उर्वरित तीन टप्प्यांतील कामासाठीच्या आर्थिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या आहेत. यात दोन टप्प्यासाठी अफकाॅन इन्फ्रास्ट्रक्चरकडून तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे.
त्यामुळे या दोन कंपन्यांनाचं कंत्राट मिळणार अशी शक्यता आहे. त्यानुसार आता येत्या काही दिवसांनी कंत्राट अंतिम केले जाणार आहे अन मग खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. खरेतर या प्रकल्पातील 9 टप्प्यातील कामांसाठी प्रत्यक्षात संबंधित कंत्राटदारांना वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आले आहेत.
दरम्यान आता उर्वरित तीन टप्प्यातील कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच या प्रकल्पाचे प्रत्यक्षात भूमिपूजन होईल आणि त्यानंतर याचे बांधकाम सुरू होईल अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रिंग रोड अंतर्गत येणाऱ्या वलाटी, हवेली ते सोनेरी, पुरंदर या ई ५ टप्प्यासाठी अफकाॅन आणि नवयुगा इंजिनीअरिंग कंपनीकडून तसेच सोनोरी ते गराडे, पुरंदर या ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट, पटेल इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेकसह अन्य एका कंपनीने अन गराडे, पुरंदर ते शिवरे, भोर या ई ७ टप्प्यासाठी नवयुगा अफकाॅनने निविदा सादर केल्या होत्या.
यात ई ५ आणि ७ टप्प्यासाठी अफकाॅनकडून आणि ई ६ टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्टकडून सर्वात कमी बोली लावण्यात आली आहे. त्यामुळे या संबंधित कंपन्यांनाच हे काम दिले जाऊ शकते असे दिसते. एकंदरीत पुणे रिंग रोडच्या सर्वच्या सर्व 12 टप्प्यांसाठीची टेंडर प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.