पुणेकरांसाठी Good News ! पुणे ते लोणावळा पाठोपाठ आता ‘या’ 74 किलोमीटर लांबीच्या मार्गावरही धावणार लोकल ?
Pune Railway News : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखप्राप्त आहे. येथे शिक्षण नोकरी व्यवसाय निमित्त स्थायिक झालेल्यांची संख्या फारच मोठी आहे. पुण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे.
म्हणूनच पुणे लोकलचा देखील विस्तार करण्याची मागणी होत आहे. सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन सुरू आहे. मात्र पुणे ते दौंड या मार्गावर देखील लोकल गाडी सुरू झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून होताना दिसते.
मंडळी सध्या पुणे- दौंड- पुणे मार्गावर डेमू ट्रेन चालवल्या जात आहेत पण या गाड्या फारच जुन्या आहेत. सध्या त्या तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणावरून त्या वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे विभागाने दोन मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट मेमूची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.
पण, या मार्गावर थेट लोकलची मागणी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने डेमू किंवा मेमूऐवजी पुणे-दौंड उपनगर घोषित करून या मार्गावर लोकल (ईएमयू) सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
ही लोकल सुरू झाल्यास पुणे ते दौंड दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास प्रवासी संघटनांकडून व्यक्त केला जातोय. पुणे ते दौंड आणि दौंड ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय असून या मार्गावर लोकल ट्रेन सुरू झाल्यास नक्कीच नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
व्यवसाय, शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने येथून अनेक जण पुण्यात येतात. त्यामुळे पुणे- दौंड दरम्यान दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दौंड, पाटस, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी, हडपसर हे पुण्याचा अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.
त्यामुळे हडपसर येथील आयटी पार्क, हॉस्पिटल, इंडस्ट्रिअल विभाग, मांजरी येथील सिरम कंपनी, कॉलेज, लोणी येथील एमआयटी विद्यापीठ, उरुळी येथील प्रयागधाम, यवतमधील गूळ उत्पादक कारखाने, कुरकुंभ एमआयडीसी, एसआरपीएफ कॅम्प, दौंड नगरपालिका येथे कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
म्हणून या मार्गावर लोकल ट्रेन सुरू झाली तर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत एक मोठा सकारात्मक बदल पाहायला मिळू शकणार आहे. पुणे ते दौंड हा 74 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून यावर लोकल सुरू करता येणे शक्य आहे. पण आता प्रवासी संघटनांच्या या मागणीवर नेमका काय निर्णय होणार? रेल्वे बोर्ड खरंच या मार्गावर लोकल सुरू करू शकते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.