Pune News: ७,५१५ कोटींच्या पुणे-शिरूर उन्नत मार्गाला हिरवा कंदील… वाहतूक होणार जलद
Pune News:- पुणे-शिरूर उन्नत मार्ग, पुणे मेट्रोचा विस्तार आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली आहे. पुणे ते शिरूरदरम्यान ५४ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून हा प्रकल्प तब्बल ७,५१५ कोटी रुपयांच्या खर्चाने साकारला जाणार आहे. हा मार्ग केवळ पुणे आणि शिरूर यांच्यातील दळणवळण सुधारण्यासाठीच महत्त्वाचा नाही तर औद्योगिक, व्यापारी आणि कृषी दळणवळणासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
याशिवाय, तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीच्या चार पदरी उन्नत मार्गाच्या कामालाही प्रस्तावित करण्यात आले आहे. हा प्रकल्प सुमारे ६,४९९ कोटी रुपयांच्या निधीतून साकारला जाणार असून चाकणसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती
वाहतुकीच्या वाढत्या गरजा लक्षात घेता पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार करण्यासाठी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या कामाला अधिकृत मान्यता देण्यात आली असून हा मार्ग सुरू झाल्यास पुण्याच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. याशिवाय, पुण्यातील आणखी दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
यामध्ये खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी हा एक मार्ग आणि नळस्टॉप-वारजे-माणिकबाग हा दुसरा मार्ग प्रस्तावित आहे. हे दोन्ही मार्ग कार्यान्वित झाल्यास पुण्यातील पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील भाग अधिक प्रभावीपणे जोडले जातील आणि नागरिकांना अधिक वेगवान आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.
मुंबईतील प्रकल्पांसाठी 64 कोटी रुपयांची तरतूद
मुंबईतील वाहतुकीच्या सुधारणा प्रकल्पांसाठी ६४ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून विविध महामार्ग, उड्डाणपूल, रेल्वे सुधारणा आणि नवीन रस्ते प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुधारणांसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.
याशिवाय, समृद्धी महामार्गाचे जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून या महामार्गाच्या लगत एक अत्याधुनिक ॲग्रो लॉजिस्टिक केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये कोल्ड स्टोरेज, गोडाऊन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या साठवणुकीसाठी आणि विक्रीसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
या सर्व महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास होणार असून वाहतूक व्यवस्था सुधारली जाईल. तसेच, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.