पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune Railway स्टेशनवरून ‘या’ मोठ्या शहरासाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ट्रेन
Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे शहरातील नागरिकांसाठी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण, येत्या काही तासात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचाराचा झंझावात शांत होणार आहे. अशातच पुणेकरांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. पुणेकरांना वंदे भारत स्लीपर ट्रेन ची भेट मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे.
भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली. सध्या देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. महाराष्ट्राला देखील 11 वंदे भारत ट्रेन मिळालेल्या आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव सीएसएमटी ते शिर्डी नागपूर ते बिलासपूर नागपूर ते सिकंदराबाद नागपूर ते इंदोर पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
वंदे भारत ट्रेन नंतर वंदे भारत मेट्रो ट्रेन सुद्धा सुरू झाली आहे. ही गाडी गुजरात राज्यात धावते. वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरात राज्यातील अहमदाबाद ते भुज दरम्यान सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन नंतर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा सुरू होणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रोटोटाइप या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आला होता. तथापि, ट्रेनने अलीकडेच चाचण्या सुरू केल्या आहेत. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे प्रमुख यू सुब्बा राव यांच्या मते, २०२५ मध्ये ट्रायल रन झाल्यानंतर ही ट्रेन अनेक मार्गांवर सुरू केली जाईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेन ऑसिलेशन चाचण्या १५ नोव्हेंबर २०२४ रोजी २ महिन्यांसाठी सुरू झाल्यात. यानंतर आता ट्रेनला प्रत्यक्ष व्यावसायिक वापरासाठी सुरू करण्यापूर्वी आणखी एका चाचणीचा विचार केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने पुढील वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये फ्लॅगशिप वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे.
याचा अर्थ या गाड्यांना यावर्षीच ट्रायल घेण्याची गरज आहे. कठोर चाचणीनंतरच गाड्या प्रत्यक्ष सेवेत दाखल केल्या जातील. अहवालानुसार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे ते दिल्ली किंवा दिल्ली ते श्रीनगर या मार्गावर तैनात केली जाण्याची शक्यता आहे.
म्हणजेच पुढल्या वर्षी पुण्याला वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही मात्र जर पुणे ते दिल्लीदरम्यान ही गाडी सुरू झाली तर या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.