Pune News: पुण्यातील तरुणांना सुवर्णसंधी! येत्या 5 वर्षात 6 हजार नोकऱ्या उपलब्ध
Pune News:- अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील कंपनी ‘यूएसटी’ने पुण्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करत नवीन कार्यालय सुरू केले आहे. या विस्तारामुळे कंपनीचे भारतातील अस्तित्व अधिक बळकट होणार असून, आगामी तीन ते पाच वर्षांत पुण्यात ३,५०० ते ६,००० नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा मोठा निर्धार कंपनीने व्यक्त केला आहे. हे नवीन कार्यालय बालेवाडी येथील ईक्यू स्मार्टवर्क्स संकुलात असून, तब्बल ८० हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. यात एक हजारांपेक्षा जास्त आसनक्षमता असून, साई राधे कॉम्प्लेक्स येथील विद्यमान कार्यालयास पूरक ठरेल.
कंपनीने केले कार्यालयाचे उद्घाटन
या कार्यालयाचे उद्घाटन ‘यूएसटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा सुधींद्र यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्य कार्यपालन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस, मुख्य मूल्य अधिकारी सुनील बालाकृष्णन, पुणे कार्यालयाचे प्रमुख रामप्रसाद संथानगोपालन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कंपनी सध्या डेटा सायन्स, डेटा अभियांत्रिकी, डिजिटल अनुप्रयोग आणि उत्पादन अभियांत्रिकी यामध्ये विशेष तज्ज्ञता राखून आहे. ‘यूएसटी’चे पुणे सेंटर हे फिनटेक, हेल्थकेअर, ऑटोमोटिव्ह आणि ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक कंपन्यांसाठी डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
‘यूएसटी’च्या मुख्य कार्यपालन अधिकारी अलेक्झांडर वर्गीस यांनी सांगितले की, पुण्यात नवीन कार्यालय सुरू करणे हा भारतातील कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. डिजिटल परिवर्तन क्षेत्रातील वाढत्या बाजाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी सक्षम आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांचा मोठा समूह उभारण्यावर भर देत आहे. कंपनीने एआय, डिझाइन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील संभाव्यतेचा विकास करत भविष्याच्या गरजांनुसार धोरणात्मक भागीदारी व पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कंपनीचे भविष्यातील विस्तार धोरण
‘यूएसटी’ने भारतातील विविध शहरांमध्ये आपले जाळे मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे नियोजन केले आहे. कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियात असून, भारतात तिरुअनंतपुरम येथे मुख्य कार्यालय आहे. बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद आणि कोइमतूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही कंपनीचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. सध्या भारतात २०,००० हून अधिक कर्मचारी ‘यूएसटी’सोबत कार्यरत असून, येत्या तीन वर्षांत या संख्येत लक्षणीय वाढ करण्याची योजना आहे. पुण्यातील नवीन गुंतवणुकीमुळे उच्चशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, महाराष्ट्रातील डिजिटल अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.