Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ह्या ठिकाणी होणार सहापदरी रस्ता
Pune News:- खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंतच्या 34 किलोमीटर लांबीच्या मुठा उजवा कालव्याच्या जागेवर सहापदरी रस्ता उभारण्याचा निर्णय झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या रस्त्याबरोबरच मेट्रो मार्गिकाही उभारली जाणार आहे.
जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या निर्णयामुळे मुठा उजवा कालव्याच्या मोकळ्या जागेवर बिल्डर आणि व्यापारी गटांकडून होणाऱ्या अतिक्रमणाला आळा बसेल. तसेच, कालव्याच्या आजूबाजूला झालेली आणि नव्याने होत असलेली अतिक्रमणे कोणत्याही स्थितीत हटवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कसा असणार हा प्रकल्प?
या प्रकल्पात खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान भूमिगत कालवा उभारला जाणार असून, त्यासाठी अंदाजे 2,200 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. सध्या हा प्रकल्प वन विभाग आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. भूमिगत कालवा झाल्यानंतर मुठा उजवा कालव्याची जागा वाहतुकीसाठी मोकळी होईल.
मात्र, मागील काही वर्षांपासून काही संघटना आणि संस्थांनी या जागांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शहरातील काही मोठ्या बिल्डरांनी ही जागा मिळवण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले असून यासाठी वारंवार मंत्रालयाच्या भेटी घेतल्या जात आहेत. तथापि, शासनाने ही जागा सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यावर सहापदरी रस्ता उभारण्याचे स्पष्ट केले आहे.
या जागेची किंमत आहे 20000 कोटी
खडकवासला ते फुरसुंगी या 34 किलोमीटर लांबीच्या कालव्याच्या जागेची बाजारभावानुसार सुमारे 20 हजार कोटी रुपये किंमत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही जागा अत्यंत मौल्यवान असून त्यावर रस्ता आणि मेट्रो मार्गिका उभारल्यास पुणे शहरातील वाहतुकीच्या समस्येवर मोठा दिलासा मिळेल.
सिंहगड रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर सततची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. याशिवाय, सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध होईल. सहापदरी रस्ता आणि भविष्यातील मेट्रो मार्गिकेमुळे नागरिकांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळेल.
हा प्रकल्प पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे फक्त वाहतूक सुलभ होणार नाही तर औद्योगिक आणि वाणिज्यिक क्षेत्रांनाही चालना मिळेल. भविष्यातील शहरीकरण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेता, या सहापदरी रस्त्यामुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.