Pune Metro News: वाहतूक कोंडीतून सुटका! नवीन मेट्रो मार्गामुळे 75% पिंपरी-चिंचवड शहर जोडले जाणार
Pune Metro News:- नवीन मेट्रो मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. दापोडी ते निगडी या मेट्रोमार्गानंतर आता निगडी ते चाकण असा दुसरा महत्त्वाचा मार्ग विकसित केला जात आहे. सध्या या मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, तो लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर केला जाणार आहे.
या मार्गाची सुरुवात निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक येथून होणार असून, तो रावेत, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा या मार्गावरून जात चाकणपर्यंत पोहोचेल. नव्या मेट्रो मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराचा जवळपास 75 टक्के भाग मेट्रोशी जोडला जाईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवडकरांना मिळेल दिलासा
पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत पुणे शहरात मेट्रोच्या विस्तारासाठी जास्त प्रयत्न केले जात असल्याने स्थानिक नागरिक आणि विविध संघटना पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन मेट्रो मार्गांची मागणी सातत्याने करत आहेत. या मागणीला प्रतिसाद म्हणून अखेर महापालिकेने निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ला सोपवले आहे.
या मार्गामुळे शहराच्या दक्षिण भागासह भोसरी, मोशी आणि चाकणसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक आणि निवासी भागांना मेट्रोने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न केला जात आहे. वाकड आणि पिंपळे सौदागरसारख्या उच्चभ्रू आणि आयटी क्षेत्राच्या भागांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे.
महामेट्रोकडून लवकर तयार केला जाणार डीपीआर
महामेट्रोकडून या मार्गाचा डीपीआर येत्या ४ ते ५ महिन्यांत तयार होण्याची शक्यता असून, त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्य व केंद्र सरकारकडे तो पाठविला जाणार आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल, मात्र ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षे लागतील. त्यामुळे या मार्गाच्या प्रत्यक्ष सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.
नाशिक फाटा ते चाकण या मार्गासाठी यापूर्वी दोन वेळा डीपीआर तयार करण्यात आला होता. प्रथम निओ मेट्रोच्या आराखड्याची कल्पना मांडली गेली, मात्र नंतर त्यात सुधारणा करून नियमित मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला. आता पुणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरी उन्नत कॉरिडॉरच्या विकासामुळे मेट्रो मार्गात बदल करण्याची गरज भासणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियोजनानुसार समन्वय साधून मेट्रोचा सुधारित डीपीआर तयार केला जाणार आहे.
नवीन मेट्रो मार्गात या स्थानकांचा राहील समावेश
या नव्या मेट्रो मार्गाच्या अंतिम स्वरूपात भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, रावेत, मुकाई चौक, पुणे-मुंबई-बंगळुरू महामार्ग, वाकड बायपास, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, भोसरी, मोशी आणि चाकण या स्थानकांचा समावेश असणार आहे. हा संपूर्ण मार्ग अंदाजे ३५ ते ४० किलोमीटर लांबीचा असेल. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता हा मेट्रो मार्ग भविष्यातील प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.