पुणेकरांना मिळणार मोठा दिलासा? हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा होणार अंत… उभारला जाणार 24 किमीचा सहापदरी Elevated Corridor?
Pune-Hinjewadi News:- हिंजवडी आणि पंचक्रोशीतील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत ते नऱ्हे दरम्यान २४ किमी लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे. सुमारे २,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाबरोबरच ६०० कोटी रुपये खर्चून सेवा रस्ते विकसित करण्याचीही योजना आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असली तरी सात महिने उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, त्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोठे होणार सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर?
हा एलिव्हेटेड कॉरिडॉर मुंबई-बंगळूर महामार्गावर (NH-48) रावेत ते नऱ्हे दरम्यान बांधला जाणार असून, त्यातून वाकड, ताथवडे, पुनावळे, बालेवाडी, बाणेर, सुस, बावधन आदी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे आयटी पार्क हिंजवडीसह संपूर्ण परिसरातील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.
जलद कृतीची गरज – पहिला टप्पा कोणता?
यातील पहिल्या टप्प्यात रावेत ते बालेवाडी (८ किमी) या भागात एलिव्हेटेड कॉरिडॉर विकसित करण्याची गरज आहे. यासाठी जलद निविदा प्रक्रिया राबवून हा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी होत आहे. कारण हिंजवडी, माण, मारुंजी, ताथवडे, पुनावळे, वाकड, किवळे आदी भागांतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाहतूक समस्यांवर नेमके उपाय काय? प्रमुख अडथळे:
सेवा रस्त्यांची खराब स्थिती – किवळे ते वाकडदरम्यानचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत.
खड्डे आणि वाहतूक कोंडी – रस्त्यावर मोठे खड्डे असल्याने वाहतूक सुरळीत नाही.
भुयारी मार्गांची उंची आणि रुंदी कमी – ताथवडे, पुनावळे, भूमकर चौक येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या.
पावसाळ्यात रस्ते जलमय – पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
आराखड्याच्या मंजुरीची प्रतीक्षा
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पिंपरी-चिंचवड, पुणे आणि ग्रामीण भागातील महामार्गालगत सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात रावेत ते वाकडपर्यंतचे सेवा रस्ते रुंद आणि दुभाजकयुक्त करण्यात येणार आहेत, तर वाकडपासून खेड-शिवापूरपर्यंत दोन्ही बाजूंना काँक्रिटीकरण होणार आहे.
एलिव्हेटेड कॉरिडॉर कसा विकसित केला जाणार?
हा प्रकल्प तीन टप्प्यांत साकारला जाणार आहे.रावेत ते बालेवाडी,बालेवाडी ते वारजे आणि वारजे ते नऱ्हे
भुयारी मार्ग वाहतूक कोंडीचे ‘हॉटस्पॉट’
मामुर्डी, विकासनगर, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक येथे भुयारी मार्ग आहेत.ताथवडे आणि पुनावळे भुयारी मार्ग उंची आणि रुंदीने अपुरी असल्याने दररोज वाहतूक कोंडी होते.पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था ठप्प – पाऊस पडला की रस्ते जलमय होतात आणि वाहनांच्या रांगा लागतात.
प्रकल्प प्रत्यक्षात कधी येणार?
या प्रकल्पाची घोषणा होऊन सात महिने झाले तरी अद्याप कोणतीही प्रत्यक्ष हालचाल दिसलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली आहे. जर लवकरच काम सुरू झाले नाही, तर हिंजवडी आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते.