मोठी बातमी ! पुणे ते अहिल्यानगर दरम्यानचा रेल्वे मार्ग महामार्गाला समांतर असणार, Pune-Nashik नवीन रेल्वे मार्गाचा संपूर्ण रूट पहा….
Pune Ahilyanagar Railway News : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पुणे - नाशिक हायस्पीडचा रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्णं त्रिकोणातील तीन शहरे. मात्र या सुवर्ण त्रिकोणातील पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरा दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनुनही थेट रेल्वे मार्ग नाहीये.
यामुळेच या दोन्ही शहरा दरम्यान थेट रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केले जात होती, लोकप्रतिनिधी देखील यासाठी पाठपुरावा करत होते. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला.
पण आता हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय झालाय. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी)ला बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित पुणे - नाशिक हायस्पीडचा रेल्वे मार्ग रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
पण, आधीचा प्रस्तावित मार्ग रद्द झाला असून या दोन्ही शहरादरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार होईल. या नव्या मार्गाचा जीएमआरटी प्रकल्पाला कोणताच धोका राहणार नाही. या नवीन मार्गाच्या डीपीआर चे काम हे कोकण रेल्वे कडून होणार आहे.
कोकण रेल्वेकडून पुणे- नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या नव्या मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्या करीता सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात झाली असल्याचे सांगितले गेले आहे. अर्थातच पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प रद्द झालेला नसून याचा मार्ग रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण या प्रकल्पाचा नवा मार्ग कसा असू शकतो याबाबत आढावा घेणार आहोत. मंडळी आधी हा मार्ग संगमनेर मार्गे जाणार होता. पण नवीन रेल्वेमार्ग शिर्डीवरून जाईल असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मार्ग पुणे- अहिल्यानगर-शिर्डी-नाशिक असा प्रस्तावित राहणार आहे.
या ठिकाणी उल्लेखनीय बाब अशी की, पुणे-अहिल्यानगर हा रेल्वेमार्ग सध्याच्या महामार्गाला समांतर राहील तर शिर्डी ते नाशिक यासाठी नवीन मार्ग निश्चित केला जाणार आहे. नव्या रेल्वे मार्गामुळे अंतरात वाढ होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी सुद्धा वाढेल.
मात्र, या मार्गात कोणतेही बाधा नसल्याने हा मार्ग पूर्ण होण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आले. नक्कीच पुणे ते नाशिक दरम्यान रेल्वे धावल्यास पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.