Shaktipeeth Expressway वरून राजकारण्यांत भांडण ! फडणवीस सरकारमध्येच मतभेद
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महायुतीतील नेत्यांमध्ये स्पष्ट मतभेद दिसून येत आहेत.आरोग्य शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी महामार्गाला विरोध दर्शवला आहे,तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
महामार्गाच्या विरोधात मंत्री मुश्रीफ
आरोग्य शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (ता. १०) स्पष्ट केले की, कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही.लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे मताधिक्यावर परिणाम झाल्याचा दावाही त्यांनी केला. "जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला तीव्र विरोध आहे, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा," असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुश्रीफ यांनी याआधीही महामार्गाच्या अधिसूचनेला विरोध दर्शवत तो कोल्हापुरातून जाणार नाही असे सांगितले होते. "शहरी आमदार या प्रकल्पाचे समर्थन करत असले तरी ग्रामीण भागातील जनता याला पाठिंबा देणार नाही," असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार क्षीरसागर
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी (ता. १०) उद्योजकांची बैठक घेत महामार्गाच्या गरजेवर भर दिला. "शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या दळणवळणात मोठी सुधारणा होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल," असे त्यांनी सांगितले.
महामार्गामुळे १८ तासांचा प्रवास केवळ ८ तासांवर येईल, याचा फायदा व्यापार, उद्योग, आणि पर्यटनाला होईल. "समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध झाला होता, मात्र सरकारने योग्य मोबदला दिल्यानंतर प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीतही संवाद साधून प्रश्न सोडवले जाऊ शकतात," असे क्षीरसागर म्हणाले.
संघर्ष समितीचा तीव्र विरोध कायम
शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने हा महामार्ग होऊ नये, यासाठी आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. "महामार्गामुळेच विकास होतो असे नाही, त्यामुळे आम्ही भविष्यातही याला विरोध करणार," असे समितीचे अध्यक्ष गिरीश फोंडे यांनी स्पष्ट केले.
महायुतीत मतभेद वाढण्याची शक्यता
महामार्गाच्या समर्थनार्थ आणि विरोधात महायुतीतील दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.भविष्यात या मुद्यावरून महायुतीच्या अंतर्गत संघर्षात वाढ होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.