Sugarcane Variety: उसाची फुले १३००७ ऊस शेतीत ठरेल गेमचेंजर! साखर कारखानदार आणि शेतकरी दोघांसाठी आहे फायदेशीर
Sugarcane Crop:- फुले १३००७ ही ऊसाची नवीन जात २०२३ मध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्वीपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सात राज्यांसाठी प्रसारित करण्यात आली आहे. या जातीची निर्मिती फुले २६५ आणि कोएम ०२५४ या जातींच्या संकरातून करण्यात आली आहे.
ही जात ऊस आणि साखर उत्पादनाच्या बाबतीत को ८६०३२ पेक्षा अधिक उपयुक्त ठरली आहे. विशेष म्हणजे, या जातीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक असून ती क्षारयुक्त जमिनीत चांगली उगवते आणि उत्पादनक्षमताही अधिक आहे.
उसाच्या या व्हरायटीचे वैशिष्ट्ये
या जातीस उशिरा आणि कमी प्रमाणात तुरा येतो, त्यामुळे साखरेचे प्रमाण अधिक राहते. भारतीय ऊस संशोधन संस्थेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत लागवडीसाठी या जातीची शिफारस केली आहे. राज्यस्तरीय चाचण्यांमध्ये फुले ऊस १३००७ जातीच्या सुरू हंगामात हेक्टरी १२९ टन, पूर्वहंगामात १३६ टन, आडसाली हंगामात १४७ टन, आणि खोडवा उत्पादन हेक्टरी १२१ टन इतके मिळाले. याचप्रमाणे, साखर उत्पादन अनुक्रमे हेक्टरी १८.४४, १९.४०, २०.५३ आणि १७.१० टन इतके नोंदवले गेले.
इतर उसाच्या जातींच्या तुलनेचा सरस
तुलनात्मक अभ्यासात, को ८६०३२ या जातीच्या तुलनेत सुरू, पूर्वहंगामी, आडसाली आणि खोडवा हंगामात फुले १३००७ च्या उसाचे उत्पादन अनुक्रमे ८.७२, १३.००, ९.१४ आणि ११.२२ टक्के अधिक होते.
तसेच, साखर उत्पादन ९.०५, १०.९८, ६.१० आणि १०.२५ टक्के अधिक मिळाले. द्वीपकल्पीय विभागात झालेल्या अंतिम चाचणीत तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये फुले ऊस १३००७ जातीचे उत्पादन को ८६०३२, कोसी ६७१, आणि कोएसएनके ०५१०३ या जातींपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध झाले.
या जातीच्या कांड्यांचे विश्लेषण करताना सरासरी व्यास २.८० सेंमी, उंची २६६ सेंमी आणि सरासरी वजन १.५३ किलो नोंदवले गेले. यातील व्यास, उंची आणि वजन को ८६०३२ पेक्षा जास्त असल्याने उत्पादन क्षमता अधिक असल्याचे स्पष्ट झाले. फुले ऊस १३००७ जातीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये हिरव्या कांड्यांचा रंग, पाचट निघाल्यानंतर पिवळसर हिरवा रंग, नागमोडी कांड्याची रचना, मध्यम आकाराचा अंडाकृती डोळा आणि गडद हिरवी टोकदार पाने यांचा समावेश आहे.
ही जात सुरू, पूर्वहंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी उपयुक्त आहे. या उसाची कांड्यांची जाडी मध्यम असून तोडणीस उशीर झाला तरी पोकळ पडत नाही. फुटवे अधिक प्रमाणात निघतात, खोडवा उत्तम राहतो, आणि पाचट सहज निघते.
तसेच, ही जात लाल कुज आणि चाबूक काणी रोगास प्रतिकारक आहे आणि शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते. याशिवाय, को ८६०३२ पेक्षा साखरेचे प्रमाण अधिक असून, तुरा उशिरा व अल्प प्रमाणात येतो. विशेष म्हणजे, ही जात अधिक काळ पाण्याचा ताण सहन करू शकते, त्यामुळे कोरडवाहू परिस्थितीतही तिचे उत्पादन चांगले राहते.
एकूणच, फुले ऊस १३००७ ही जात साखर आणि ऊस उत्पादनाच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरली असून, तिच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन व चांगला नफा मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.