लोकांनी वेड्यात काढलं पण... माती वाचवणारा Land Hero ! पुण्याच्या तरुणाचा जागतिक स्तरावर गौरव...
पाणी नाही, शेती नापीक, आणि कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करताना पाहणाऱ्या एका तरुणाने स्वप्न पाहिलं - माती वाचवायचं, शेतकऱ्यांना उभं करायचं. दुष्काळग्रस्त गावाच्या कोरड्या जमिनीतून उगवलेली त्याची मेहनत आणि जिद्द आज संपूर्ण जगाने पाहिली आहे. सिद्धेश साकोरे, एक तरुण जो रासायनिक खतांमुळे मरणासन्न मातीसाठी लढला, शेतकऱ्यांना नवीन दिशा दिली, आणि त्याच्या कामाची दखल थेट संयुक्त राष्ट्राने घेतली.
जिथे कोरड्या जमिनीवर फक्त निराशा दिसत होती, तिथे त्याने हिरवी स्वप्नं फुलवली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित झालेल्या सिद्धेशची ही प्रेरणादायी कहाणी प्रत्येकाला विचार करायला लावते की, जिद्द, मेहनत, आणि स्वप्नं साकार करण्याची तळमळ असेल, तर कोणत्याही संकटावर मात करता येते.
कोरड्या माळरानावर जन्मलेला, दुष्काळाच्या चटके सोसणारा आणि रासायनिक खतांमुळे नापीक झालेल्या जमिनीतून फुलवलेल्या मेहनतीची ही कहाणी आहे. सिद्धेश साकोरे, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या केंदूर गावातील एक तरुण, ज्याने माती वाचवण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं.
रोजगारासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या सिद्धेशने गावाकडच्या जमिनीत वाढत चाललेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे होणाऱ्या मातीच्या ऱ्हासाचं गांभीर्य ओळखलं आणि संपूर्ण वेळ शेती आणि माती संवर्धनासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचं एक मॉडेल तयार केलं, ज्यामुळे मातीचं आरोग्य सुधारलं आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. आज त्याच्या कामाची दखल थेट संयुक्त राष्ट्राने 'Land Hero' पुरस्काराने घेतली आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरपासून माती संवर्धनापर्यंतचा प्रवास
सिद्धेश साकोरेने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या संधी सोडून पाबळ विज्ञान आश्रमासोबत स्थानिक शेतकऱ्यांसाठी काम करण्याची दिशा निवडली. ४-५ हजार शेतकऱ्यांच्या माती परीक्षणात त्याला मातीतील सेंद्रीय कर्ब कमी झाल्याचं लक्षात आलं. मातीच्या आरोग्यावर होणाऱ्या या गंभीर परिणामामुळे त्याने पूर्णवेळ माती संवर्धनाचं काम सुरू करण्याचं ठरवलं.
वनशेती मॉडेलची यशस्वी सुरुवात
सिद्धेशने धामारी गावातील कोरडवाहू जमिनीत विविध प्रयोग सुरू केले. सुरुवातीला कुटुंबियांचा विरोध झाला, परंतु शेजारील गावात शेती भाड्याने घेऊन प्रयोग यशस्वी करून दाखवल्यानंतर त्याला पाठिंबा मिळाला.
वनशेतीच्या सेंद्रिय शेती मॉडेलवर आधारित प्रयोगांमुळे कमी खर्चात मातीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याची संधी मिळाली. मल्टिलेअर फार्मिंग, पॉलीहाऊस, परदेशी भाजीपाला लागवड अशा विविध तंत्रज्ञानांचा अभ्यास करून त्याने वनशेती मॉडेलमध्ये चांगला यश मिळवलं.
संयुक्त राष्ट्रांकडून ‘Land Hero’ पुरस्कार
सिद्धेशच्या कामाची दखल घेऊन UNCCD ने २०२४ मध्ये 'Land Hero' पुरस्काराने सन्मानित केले. त्याचा हा प्रवास केवळ माती संवर्धनाचा नाही, तर ग्रामीण भागातील तरुणांना सशक्त करणारा आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने मार्गदर्शन करणारा आहे.
लोकांच्या टीकेपासून आंतरराष्ट्रीय यशापर्यंतचा प्रवास
वनशेतीच्या प्रयोगाला सुरुवात करताना सिद्धेशला “तोट्यात जाशील” अशा टीका सहन कराव्या लागल्या. मात्र, त्याच्या जिद्दीने हे मॉडेल यशस्वी ठरले. आज त्याच्या कामाची दखल संयुक्त राष्ट्रांसह आयआयएम बंगळुरू, पाबळ विज्ञान आश्रम, कृषीथॉन यांसारख्या संस्थांनी घेतली आहे.
धामारी गावातील कोरडवाहू जमिनीतून सुरू झालेला सिद्धेशचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. मातीच्या संवर्धनासाठी निस्वार्थ भावनेने काम करत शाश्वत शेतीचं यशस्वी मॉडेल उभारणारा सिद्धेश साकोरे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे. त्याचा हा प्रवास शेतकऱ्यांच्या भविष्याला आणि पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा देणारा आहे.