द्राक्ष पट्ट्यात फुलवला मोसंबीचा मळा! 2 एकरात मिळेल 7 लाखापेक्षा जास्त उत्पन्न
Mosambi Lagwad:- कृषी क्षेत्राच्या बाबतीत नाशिक जिल्हा जर बघितला तर प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष उत्पादनाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड केली जाते. तर मालेगाव तसेच सटाणा, देवळा, मालेगाव आणि येवल्यासारख्या तालुक्यांमध्ये डाळिंब तसेच द्राक्ष व कांदा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
परंतु याच नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या एरंडगाव येथील रहिवाशी असलेले रावसाहेब पाटील व दिलीप पाटील या शेतकऱ्यांनी तब्बल 30 टन मोसंबी फळाचे उत्पादन घेतले असून त्यांची शेतीतील कामगिरी नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व आदर्श ठरली आहे.
दोन एकरात घेतले मोसंबीचे 30 टन उत्पादन
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या एरंडगावचे गतिशील शेतकरी रावसाहेब आणि दिलीप पाटील यांनी विदर्भात पिकणाऱ्या मोसंबी फळ पिकाचे उत्पादन येवला तालुक्यात घ्यायचे ठरवले व मोसंबी लागवड करण्याचा निर्णय घेतला.
पाटील बंधूंनी न्यू शेलार या वाणाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आठ बाय बारा या अंतरावर दोन वर्षांपूर्वी मोसंबीची लागवड केली.उत्पादनाच्या पहिल्या वर्षी म्हणजेच मागच्या वर्षी त्यांना हवे तितके उत्पादन मिळाले नाही.
मोसंबी लागवडीचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी मात्र मोसंबीचे त्यांना भरघोस उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. आज जर आपण त्यांच्या शेतात असलेल्या एका मोसंबीच्या झाडाला जर बघितले तर वीस ते बावीस मोसंबीची फळे लागल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे या मोसंबी बागेमध्ये त्यांनी कांदा तसेच हरभरा व सोयाबीन सारख्या पिकांचा देखील आंतरपीक म्हणून आंतर्भाव केला व त्यातून देखील चांगले उत्पादन मिळवून चांगला आर्थिक नफा मिळवला. पाटील बंधूंनी दोन एकर मध्ये 1450 मोसंबीच्या रोपांची लागवड केली असून प्रतिरोप 70 रुपये प्रमाणे त्यांना रोपे मिळाले होते.
जेव्हा ते या मोसंबीच्या पिकामध्ये आंतरपीक घेतात व या पिकांना दिलेली खते तसेच औषधे याचा फायदा मोसंबी पिकाला देखील लागू पडला व त्याचा देखील त्यांना फायदा झाला. म्हणजे त्यांनी मोसंबी पिकासाठी वेगळा कुठलाही प्रकारचा खर्च केला नाही.
त्यांनी पिकवलेली मोसंबी पंचवीस रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली असून एका झाडाला 20 ते 30 किलो फळांचे उत्पादन त्यांना मिळाले व या 30 टन मोसंबी विक्रीतून या दोन्ही भावांना सात लाख 35 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
शेतात वेगळी वाट धरण्याचा झाला फायदा
इतर पारंपारिक पिकांना मशागतीपासून तर त्यांची काढणी व तयार शेतीमाल बाजारात नेण्यापर्यंत मोठा खर्च झालेला असतो व त्या माध्यमातून मात्र उत्पन्न मिळेल याची कुठलीही शाश्वती नसल्यामुळे आम्ही दोन्ही भावांनी विचार करून वेगळी वाट निवडण्याचे धाडस केले व त्यामध्ये आम्हाला जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा अधिक फायदा झाल्याचे मत रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.