Panvel-Karjat Railway: मुंबई-पुणे प्रवास आता वेगवान! ‘हा’ रेल्वे मार्ग लवकर सुरू होणार
Panvel-Karjat Railway:- पनवेल–कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू असून, पुढील ९ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठरवले आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. सध्या या रेल्वेमार्गाचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, मोहापे ते चिखलेदरम्यान रेल्वे रूळ मार्ग जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत कर्जत ते चौकदरम्यानच्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या रेल्वेमार्गाचा फायदा कुणाला?
पनवेल-कर्जत रेल्वेमार्गामुळे मुंबईतील वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या ताणाचे विभाजन होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प २०१८ साली मंजूर झाला आणि त्यानंतर या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ५६.८२ हेक्टर खासगी जमीन आणि ४.४ हेक्टर सरकारी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. याशिवाय ९.१३ हेक्टर वनजमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी मिळाली असून, यात सरकारी आणि खासगी वनजमिनींचा समावेश आहे.
सध्या या प्रकल्पांतर्गत मोठे आणि लहान पूल, उड्डाणपूल, पादचारी पूल आणि अतिरिक्त पूल यांची बांधकामे वेगाने सुरू आहेत. मोहापे ते चिखलेदरम्यान ७.८ किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार झाला असून, या मार्गावर ईयूआर रेकची वाहतूक सुरू आहे. या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यावर पुढील जोडणी कर्जत-चौकदरम्यान सुरू होणार आहे.
या रेल्वेमार्गाचे स्वरूप
याशिवाय, पुणे एक्सप्रेस वेजवळील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर मोहापे आणि किरवली येथील प्रमुख चार उड्डाणपूल पूर्ण झाले आहेत. पनवेल-कर्जत मार्गावर एकूण पाच स्थानके उभारली जाणार असून, पनवेल, चौक, मोहापे, चिखले आणि कर्जत ही स्थानके असतील. या स्थानकांच्या बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे.
विशेषतः पनवेल स्थानकावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, तेथे स्थानक इमारत, कर्मचारी निवासस्थान, ओव्हरहेड वायर साधनांचे आगार आणि पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. फलाट आणि पादचारी पुलांचे नियोजनही अंतिम टप्प्यात आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि मुंबईला जोडणारा एक अतिरिक्त मार्ग उपलब्ध होईल. हा मार्ग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर माल वाहतुकीसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे पनवेल आणि कर्जत दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.