Organic Fertilizer : शेणखतामुळे पिकाची उत्पादन क्षमता कशी वाढवायची? इथे जाणून घ्या!
Organic Fertilizer:- शेणखताचा वापर हा जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सेंद्रिय खतांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे खत म्हणजे शेणखत. कारण अनेक शेतकऱ्यांकडे घरची जनावरे असल्यामुळे त्यांना सहजतेने शेणखत उपलब्ध होते. मात्र, बऱ्याच वेळा हे शेणखत थेट शेतात वापरण्यात येते, जे व्यवस्थित कुजलेले नसते. अशा शेणखताचा पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवण्यासाठी आणि तिची सुपीकता वाढवण्यासाठी कुजलेले शेणखत अत्यंत उपयुक्त ठरते. काही शेतकऱ्यांना वाटते की, शेणखत टाकल्यावर जमिनीत आणखी काही घालण्याची गरज नसते, पण हे चुकीचे आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखतात अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असते, मात्र त्यातील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीत सूक्ष्मजीव वाढण्यास मदत होते आणि भूसुधारणेचे काम होते.
शेणखताचा योग्य वापर केल्याचे फायदे
शेणखताचा योग्य वापर केल्याने जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात. यामध्ये ॲझेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांचा समावेश होतो. नियमित शेणखत वापरल्यास गांडुळे वाढतात, ज्यामुळे जमिनीची संरचना सुधारते आणि पांढऱ्या मुळींची वाढ चांगली होते. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि जमिनीच्या सामूवर (pH) अनुकूल परिणाम होतो. मात्र, हे फायदे केवळ पूर्णपणे कुजलेल्या शेणखताच्या वापरानेच मिळतात. जर शेणखत अर्धवट कुजलेले असेल, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे काय होते?
अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे ते शेतात टाकल्यावर कुजण्याची प्रक्रिया जमिनीत सुरू होते आणि त्यामुळे उष्णता निर्माण होते. ही उष्णता पिकांच्या मुळांना शॉक देते, ज्यामुळे उत्पादनात घट येते. याशिवाय, अशा शेणखतामध्ये हुमणी, भुंगे वगैरे किडींची अंडी आणि अळ्या असतात, ज्या पिकांसाठी घातक ठरतात. तसेच, यामुळे मररोग, मूळकूज, करपा यांसारखे बुरशीजन्य रोग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेणखत पूर्णपणे कुजलेले वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
शेणखत कुजवण्यासाठीचे उपाय
शेणखत योग्य पद्धतीने कुजवण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. यासाठी प्रति टन शेणखतावर एक किलो किंवा एक लिटर कंपोस्ट कल्चर टाकून ते व्यवस्थित खाली-वर करून मिक्स करावे. यामुळे शेणखत लवकर कुजते आणि त्यातील पोषणमूल्ये टिकून राहतात. बुरशीजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि सुडोमोनास फ्लुरोसन्स यांसारख्या जैविक घटकांचा वापर करावा. हे घटक शेणखतावर टाकून चांगले मिक्स करावेत. तसेच, शेणकिड्यांचे नियंत्रण करण्यासाठी मेटारायझिम ॲनिसोप्ली आणि बिव्हेरिया बॅसियाना यांसारखी जैविक कीडनाशके वापरावीत. शेणखत ओलसर ठेवण्यासाठी त्यावर योग्य प्रमाणात पाणी शिंपडावे.
शेणखताचा वापर करताना जमिनीची मशागत पूर्ण झाल्यावर शेवटी कुळवणीच्या आधी प्रति हेक्टर ५ ते १० टन शेणखत मिसळावे. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर केल्याने पिकांचे आरोग्य सुधारते. फळबागांसाठी एकरी १० ते १५ टन शेणखत द्यावे. शेणखताचा वापर व्यवस्थित पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केल्यास जमिनीची सुपीकता टिकते, पिकांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.