एक दोन नाही तब्बल २४ हार्वेस्टिंग मशीनचा मालक ! जाणून घ्या शेतकरी आनंदराव घाटगे यांची प्रेरणादायी यशोगाथा
पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्यांमध्ये हार्वेस्टिंग मशीनने ऊस तोडणी करण्याची प्रवृत्ती वेगाने वाढत आहे. विशेषतः पन्हाळा तालुक्यातील आरळे गावातील आनंदराव घाटगे यांनी तब्बल २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा ताफा उभारून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील ६ प्रमुख साखर कारखान्यांसाठी त्यांची हार्वेस्टिंग यंत्रणा ऊसतोडणीचे काम करत आहे, त्यामुळे त्यांचा व्यवसाय एक आदर्श मॉडेल म्हणून समोर आला आहे.
२४ मशीनपर्यंतचा प्रवास
शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या आनंदराव घाटगे यांनी ऊसतोडणीमध्ये यंत्रमागीकरणाची गरज ओळखून पहिले हार्वेस्टिंग मशीन खरेदी केले. पहिल्या हंगामातच १२,००० टन ऊस मशीनने तोडला गेला. त्यांनी १ कोटी २० लाख रुपये गुंतवून पहिले मशीन खरेदी केले होते, ज्याची किंमत आता १ कोटी ३२ लाखांपर्यंत वाढली आहे. यशस्वी व्यवसायाच्या बळावर त्यांनी आता तब्बल २४ हार्वेस्टिंग मशीनचा मोठा ताफा उभा केला आहे.
मुलांची व्यवसायात सहभाग
घाटगे यांची मुले उच्चशिक्षित असूनसुद्धा पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन ऊस हार्वेस्टिंग व्यवसायात उतरली आहेत. अभिजित घाटगे यांनी अॅग्रीकल्चरची पदवी घेतली असून अनिकेत घाटगे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानाचा फायदा घेत त्यांनी व्यवसाय अधिक गतिमान केला. विशेष म्हणजे, अनिकेत घाटगे यांनी स्वतःचे वर्कशॉप सुरू करून मशीनच्या देखभालीचा स्वतंत्र व्यवसायही सुरू केला आहे.
आरळे गाव: हार्वेस्टिंग मशीन आणि ऑपरेटरचे गाव
हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाची गरज ओळखून घाटगे यांनी गावातील तरुणांना प्रशिक्षित करण्यावर भर दिला. त्यांनी गावातील एका व्यक्तीला तामिळनाडूमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले. आज त्याच गावात ५० हून अधिक ऑपरेटर आहेत, जे स्वतः हार्वेस्टिंग मशीनच्या मालक बनले आहेत. त्यामुळे आता आरळे गाव "हार्वेस्टिंग मशीन आणि ऑपरेटरचे गाव" म्हणून ओळखले जाते.
व्यवसायाची भक्कम यंत्रणा:
- २४ ऊसतोड मशीन
- ५० इनफिल्डर ट्रॅक्टर
- प्रत्येक दोन मशीनसाठी एक व्यवस्थापक
- प्रत्येक मशीनमागे ६ ट्रॅक्टर
- २४ मशीनसाठी १४४ ट्रॅक्टर
- एकूण कामगार संख्या १२५ पेक्षा अधिक
- दिवसाला प्रति मशीन १२० ते १५० टन ऊस तोडणी
जोखीम पत्करून मोठा उद्योजक बनण्याचा प्रवास
पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ऊस हार्वेस्टिंग मशीन खरेदी करण्याचा धाडसी निर्णय आनंदराव घाटगे यांनी घेतला. सुरुवातीला काही अडचणी आल्या, तांत्रिक समस्या आणि खर्चाच्या जोखमींमुळे व्यवसाय थोड्या काळासाठी थांबला, मात्र त्यांनी हार न मानता व्यवसाय पूर्ववत सुरू केला.
आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हार्वेस्टिंग मशीनच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे वेळ आणि मजूर दोन्हीचा मोठा फायदा होत आहे. घाटगे यांचा हा प्रवास नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो.