12.6 कीमीचा प्रवास अवघ्या 22 मिनिटात! पण मुंबई मेट्रो-3 कडे प्रवाशांची पाठ… मुंबईकरांना भूमिगत मेट्रो नको की सुविधा अपुरी! वाचा सत्यता
Mumbai Metro-3:- मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो-३ चा पहिला टप्पा सुरू होऊन चार महिने झाले असले तरी, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या मेट्रो मार्गाने आतापर्यंत फक्त २७ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर प्रतिदिन ४ लाख प्रवाशांना नेण्याची क्षमता आहे. प्रतिदिन केवळ २० हजार प्रवासी मेट्रोचा वापर करत असल्याने हा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरताना दिसत नाही. यामागचे एक मोठे कारण म्हणजे स्टेशनपासून गंतव्यस्थानापर्यंत जाण्यासाठी पुरेशा सार्वजनिक वाहतूक सुविधांचा अभाव. परिणामी, अनेक प्रवाशांना शेवटच्या टप्प्यातील प्रवास करणे कठीण जात आहे, त्यामुळे त्यांचा कल अन्य पर्यायांकडे वळला आहे.
केव्हा झाली या मेट्रो सेवेची सुरुवात?
ही मेट्रो सेवा ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली आणि ७ ऑक्टोबरपासून प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. अवघ्या २२ मिनिटांत हा प्रवास पूर्ण करता येतो, जो रस्त्याने साधारणतः एका तासाचा असतो. या वेगवान प्रवासाचा फायदा असूनही प्रवाशांनी मेट्रोकडे पाठ फिरवली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (MMRC) आकडेवारीनुसार, २० फेब्रुवारीपर्यंत एकूण २६.६३ लाख प्रवाशांनी या मेट्रोचा वापर केला. या कालावधीत २९,१६२ फेऱ्या चालवण्यात आल्या असून मेट्रोची वेळेवर धावण्याची टक्केवारी ९९.६०% इतकी आहे. तरीही, प्रवाशांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मेट्रो-३ हा कॉरिडॉर आरे ते कुलाबा दरम्यान बांधला जात असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२६ च्या सुरुवातीला संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा मानस आहे. सध्या कुलाबा ते बीकेसी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे ९३% काम पूर्ण झाले आहे. एकदा हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यावर, लोकल ट्रेनऐवजी अनेक प्रवासी मेट्रोला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याशिवाय, इतर मेट्रो मार्गांशी जोडणी झाल्यास प्रवाशांची संख्याही लक्षणीय वाढू शकते.
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामागील कारणे
प्रवाशांच्या कमी प्रतिसादामागे महागडी तिकिटे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर मेट्रो मार्गांच्या तुलनेत मेट्रो-३ साठी प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत. १२.२ किमीच्या प्रवासासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागत आहेत, तर मेट्रो-७ आणि मेट्रो-२ए वर समान अंतरासाठी फक्त २० रुपये शुल्क आहे. तसेच, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो-१ मार्गावर ११.४ किमी प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रवासी अधिक स्वस्त आणि सोयीस्कर पर्यायांचा विचार करत आहेत.
याशिवाय, मेट्रो स्थानकांजवळ पुरेशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांना मेट्रोपेक्षा अन्य पर्याय सोयीस्कर वाटत आहेत. विशेषतः बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संस्था असूनही, इतर भागांतून तिथे पोहोचण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, केवळ बीकेसीमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांनीच मेट्रो-३ चा स्वीकार केला आहे.
तथापि, हा कॉरिडॉर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांजवळून जात असल्याने भविष्यात प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकल ट्रेन आणि बससारख्या इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा वेगवान प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून दिला, तरीही महागडी तिकिटे आणि अपुरी कनेक्टिव्हिटी या कारणांमुळे सध्या मेट्रो-३ अपयशी ठरत आहे. भविष्यात अधिक चांगली नियोजनबद्ध जोडणी आणि स्वस्त भाडे दर उपलब्ध करून दिल्यास ही परिस्थिती बदलू शकते.