Mumbai-Goa Mahamarg: १५,६०० कोटी खर्च! महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग होणार लवकर सुरू
Mumbai-Goa Mahamarg:- महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, पुढील ९ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे विधानसभेत स्पष्ट करण्यात आले आहे. हा महामार्ग तब्बल १५,६०० कोटी रुपये खर्चून तयार होत असून, त्याची लांबी सुमारे ४६० ते ४७१ किमी आहे.
मागील १३ वर्षांपासून हे काम रखडलेले असले तरी आता त्याला वेग मिळाला असून, डिसेंबर २०२५ पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सध्याचा मुंबई-गोवा प्रवास जो १३ तास घेतो, तो फक्त ५ ते ६ तासांत पूर्ण करता येईल, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि इतर सदस्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर देत, महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट केले.
महामार्गाची कामे वेगात सुरू
महामार्गाच्या विविध भागातील कामे वेगाने सुरू आहेत. पनवेल ते इंदापूर (८४.६० किमी) भागातील ७४.८० किमी रस्ता पूर्ण झाला असून, पनवेल ते कासू (४२.३ किमी) भागातील पूल आणि उड्डाणपुलांचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कासू ते इंदापूर (४२.३ किमी) भागातील मोठे पूल आणि उड्डाणपुलांचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. कोकणातील सर्वात मोठी अडचण ठरणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्यांपैकी एक बोगदा पूर्ण झाला असून, तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
उर्वरित बोगद्यासाठीचे काम वेगाने सुरू असून, तो एप्रिल २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होईल. हा महामार्ग पनवेल, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, पणजी, कानाकोना आणि मडगाव या शहरांमधून जाणार आहे.
हा महामार्ग संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा
मुंबई-गोवा महामार्ग हा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांना जोडणारा हा महामार्ग वाहतूक वेगवान आणि सुरक्षित करण्यास मदत करेल. महामार्गाच्या पूर्णत्वामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
या महामार्गामुळे गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होईल. तसेच, कोकण आणि दक्षिण भारताशी व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा मार्ग अधिक फायदेशीर ठरणार आहे. महामार्गाच्या कामात झालेल्या विलंबामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र आता त्यावर तोडगा निघत असून, सरकारच्या म्हणण्यानुसार दिलेल्या वेळेत काम पूर्ण होणार आहे.
महामार्गाच्या कामामुळे सध्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी जाणवत असली तरी, एकदा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे चित्र बदलणार असून, संघटित वाहतूक आणि जलदगती प्रवासाची नवी सुविधा लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.