Mumbai Airport: 9 नोव्हेंबर 2025! या दिवशी मुंबई विमानतळावर होणार ऐतिहासिक बदल.. प्रवाशांनो जाणून घ्या महत्वाची माहिती
New Mumbai Airport:- मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एप्रिल 2025 मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असून, 15 मे 2025 पासून येथे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील वाढता ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.
मात्र, दुसरीकडे, मुंबई विमानतळाचे टर्मिनल-1 (T-1) ऑक्टोबर 2025 पासून पुनर्बांधणीसाठी बंद होणार असून, हे काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत हे टर्मिनल प्रवाशांसाठी उपलब्ध असणार नाही. यामुळे मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.
विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA), विमानतळ प्राधिकरणाचे (AAI) अध्यक्ष विपिन कुमार, नागरी विमान वाहतूक ब्युरोचे (BCAS) प्रादेशिक संचालक प्रकाश निकम तसेच अदानी विमानतळ होल्डिंग्ज (AAHL) आणि महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांचे अधिकारी यांनी संयुक्तपणे नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली.
या पथकाने विमानतळाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला असता, हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आढळले. विमानतळाच्या मूल्यांकन प्रक्रियेस देखील गती मिळाली असून, 5 मार्चपर्यंत सर्व आवश्यक परवानग्यांसाठी अर्ज सादर केले जातील. त्यानंतर, विमानतळ ऑपरेटरकडून DGCA कडे विमानतळ परवानगीसाठी अर्ज केला जाणार आहे. सर्व परवानग्या वेळेत मिळाल्यास, 15 मे 2025 पासून नवी मुंबई विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू होऊ शकते.
नवी मुंबई एअरपोर्ट महत्त्वाचे
मुंबई विमानतळावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाला एक महत्त्वपूर्ण पूरक पर्याय ठरणार आहे. 1160 हेक्टर क्षेत्रफळावर वसवलेले हे विमानतळ एकाच वेळी 350 विमाने पार्क करण्याच्या क्षमतेने बांधले जात आहे. तसेच, या विमानतळावर 3.7 किलोमीटर लांबीचा रनवे असेल.
पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर, येथे दरवर्षी 9 कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक होऊ शकणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी चार टप्प्यांची योजना आखण्यात आली आहे. पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल, दुसरा टप्पा 2029 पर्यंत, तिसरा टप्पा 2032 पर्यंत, आणि अंतिम म्हणजेच चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, मुंबई विमानतळाच्या T-1 टर्मिनलचे पुनर्बांधणीचे काम ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू होईल. हे टर्मिनल 2029 मध्ये पुन्हा प्रवाशांसाठी खुले होणार आहे. पुनर्बांधणीच्या काळात, T-1 टर्मिनलमधून प्रवास करणाऱ्या सुमारे दीड कोटी प्रवाशांपैकी, एक कोटी प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई विमानतळावरून केली जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत नवी मुंबई विमानतळ हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील हवाई वाहतुकीत मोठा बदल होणार असून, नव्या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून विमानतळाच्या कामांना वेग दिला जात असून, निर्धारित वेळेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.