Monsoon 2025: हवामान खात्याचा स्फोटक अंदाज....यंदा भारतात अधिक पाऊस पडणार की कोरडे हवामान?
Monsoon 2025:- 2025 च्या मान्सून हंगामाबाबत देशातील तसेच आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांकडून सविस्तर अंदाज जाहीर करण्यात येत आहेत. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (ECMWF) च्या ताज्या अंदाजानुसार, भारतात यंदाचा मान्सून चांगला राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) एप्रिलच्या मध्यापर्यंत दीर्घकालीन अंदाज सादर करू शकतो.
विशेष म्हणजे, यंदा उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागर वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या उत्तरार्धात ‘तटस्थ’ स्थितीत राहणार आहे, म्हणजेच एल निनो किंवा ला निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत स्थानिक हवामान घटक मान्सूनच्या स्वरूपावर प्रभाव टाकतील. यामुळे संपूर्ण देशभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
देशाच्या पश्चिम किनार्यावर जोरदार पावसाची शक्यता
मान्सूनपूर्व हंगामात म्हणजेच एप्रिल, मे आणि जून या महिन्यांत देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, गोवा, कर्नाटकचा किनारी भाग आणि केरळमध्ये हवामानातील बदल जाणवतील. हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, जुलै ते सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद होईल. या पावसामुळे पश्चिम भारतातील जलस्रोत अधिक मजबूत होतील आणि शेतीसाठी पोषक वातावरण तयार होईल.
याशिवाय, मध्य भारतातील पश्चिम भाग, विशेषतः पश्चिम मध्य प्रदेश, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांतील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तेलंगणामध्येही मान्सूनचा प्रभाव दिसून येईल, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत त्याची तीव्रता किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये मात्र पाऊस सरासरी प्रमाणात राहील.
बंगालच्या उपसागरातून येणारा मान्सून अधिक सक्रिय राहील
भारतीय उपखंडात मान्सून मुख्यतः बंगालच्या उपसागरातून प्रवेश करतो आणि त्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांत पसरतो. हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2025 मध्ये मे, जून आणि जुलै महिन्यांत बंगालच्या उपसागरातून येणारा मान्सून अत्यंत सक्रिय राहील. त्यामुळे मध्य भारतातील राज्यांमध्ये जसे की मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होईल.
त्यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल तसेच जलस्रोतही अधिकाधिक भरून निघतील. पावसामुळे नद्या, धरणे आणि भूजल पातळीत वाढ होईल. गुजरात आणि सौराष्ट्र भागांतही जून ते ऑगस्ट दरम्यान सातत्यपूर्ण पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये काही भागांत तुलनेने कमी पाऊस राहू शकतो.
मान्सूनचा संपूर्ण देशावर प्रभाव
यावर्षी मान्सूनचा प्रभाव संपूर्ण देशभर दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती, जलसंपत्ती व्यवस्थापन आणि जलविद्युत निर्मितीच्या दृष्टीने हा मान्सून महत्त्वाचा ठरणार आहे. मागील काही वर्षांमध्ये मान्सूनमध्ये मोठे चढ-उतार दिसून आले होते, परंतु यंदा संपूर्ण देशभर समतोल व पुरेसा पाऊस होण्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विशेषतः मराठवाडा, विदर्भ, गुजरात आणि ओडिशा या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहील, त्यामुळे या भागांतील जलसाठे समाधानकारक राहतील. एकूणच, 2025 मध्ये भारतात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे शेतकरी, जलसंपत्ती नियोजन व पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा हंगाम अनुकूल ठरू शकतो.