चंद्रपूरची मिरची युरोपमध्ये हिट ! शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा
Mirchi Export Succes Story : महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या मिरचीसारखीच आता चंद्रपूरची लाल मिरचीही आपला ठसा उमटवत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची आता थेट युरोपियन बाजारपेठेत पोहोचली असून, तिथे तिची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्तम दर मिळत असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरच्या मिरचीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान
चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना आणि राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीनची शेती केली जाते. मात्र, आता शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची उत्पादनाकडे वळत आहेत. याआधी येथे पारंपरिक पद्धतीने मिरची पिकवली जात होती, मात्र त्यास समाधानकारक बाजारभाव मिळत नव्हता.
कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले आणि त्यांना युरोपियन मानकांनुसार मिरची उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले. यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मिरचीची लागवड करण्यात आली.
अवशेष-मुक्त (Residue-Free) मिरचीला युरोपात मागणी
युरोपियन बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी मिरचीची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांना रासायनिक अवशेष मुक्त मिरची उत्पादनासाठी प्रोत्साहित केले. यामुळे, पहिल्याच वर्षी राजुरा तालुक्यातील चार शेतकऱ्यांनी उत्पादन केलेली मिरची बेंगळुरूमधील कठोर चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाली.
चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत संधी
शेतकरी स्वप्नील झुरमुरे, चंद्रकांत पिंपळकर आणि दिनकर डाहुले यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला युरोपियन बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लाल मिरचीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले असून, भविष्यात आणखी शेतकऱ्यांना निर्यातीची संधी मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या मिरचीसाठी युरोपमध्ये वाढणारी मागणी हे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, उच्च गुणवत्ता आणि निर्यातक्षम उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मिरची उत्पादकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.