Marigold Farming: हिंगोलीचा झेंडू थेट दक्षिण भारतात! हिंगोलीच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग…. 1 एकरात मिळवला 2.5 लाखांचा नफा
Farmer Success Story: आजच्या काळात तरुण शेतकरी शेती सोडून शहराकडे वळत आहेत. शेतीत नफा नाही, पिकांना योग्य बाजारभाव मिळत नाही, कर्जाचा बोजा वाढतो, संसाराचा गाडा हाकणं कठीण होतं – या सगळ्या कारणांमुळे अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत सापडत आहेत. मात्र, या परिस्थितीतही हिंगोली जिल्ह्यातील सरकळी गावच्या गजानन संभाजी पवार यांनी शेतीत नवा प्रयोग करून यश मिळवलं आहे. त्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत झेंडूच्या लागवडीकडे वाटचाल केली आणि अल्पभूधारक असूनही लाखोंचं उत्पन्न मिळवलं.
झेंडू शेतीचा नवा प्रयोग – लाखोंचा नफा!
गजानन पवार यांनी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात झेंडू फुलांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतात उन्हाळ्यात आणि लग्नसराईच्या हंगामात झेंडूची मोठी मागणी असते. त्यांनी मागील सहा वर्षांपासून उन्हाळ्यात झेंडूची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यंदा त्यांनी एक एकर शेतीत अस्टर जातीच्या लाल, केशरी आणि पिवळ्या रंगांच्या झेंडू फुलांची लागवड केली आहे. या रोपांसाठी त्यांनी खासगी नर्सरीमधून प्रत्येकी तीन रुपयांना रोपं खरेदी केली.
शेतीची आधुनिक पद्धती – उत्पादनात वाढ!
सोयाबीन पीक काढणीनंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने योग्य मशागत करून त्यांनी शेणखत आणि इतर आवश्यक खतांचा वापर केला. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी ड्रीप सिंचन पद्धतीने झेंडूची लागवड केली. सुमारे 60,000 रुपयांचा खर्च झाल्यानंतर त्यांनी झेंडूच्या झाडांची विशेष काळजी घेतली. कीटकनाशक फवारणी, नियमित खतं आणि पाण्याच्या व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ झाली. ड्रीपमधून 12-61, 19-19, 13-40 या आवश्यक खतांचा पुरवठा केल्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली आणि मोठ्या, वजनदार फुलांचं उत्पादन मिळालं.
फुलांचा पहिला तोडा – एक लाखांचं उत्पन्न!
फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा फुलं तोडण्यात आली असून पहिल्या टप्प्यातच त्यांना 1 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. पुढील काही आठवड्यांत त्यांना अजून 2 ते 2.5 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, दक्षिण भारतातील कलीमनगर, वरंगल, भोपाळ, निजामबाद, हैदराबाद, कल्याण आणि दादर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये या झेंडूची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
गजानन पवार यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून आधुनिक शेतीचा अवलंब केला आणि झेंडूच्या उत्पादनातून चांगला नफा मिळवला. त्यांच्या या यशामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा मिळू शकते. "पारंपरिक पिकांना योग्य भाव मिळत नाही, म्हणून नैराश्यात जाण्यापेक्षा नवीन प्रयोग करायला हवेत. योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीने शेतीतही चांगलं यश मिळू शकतं," असं ते सांगतात.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मागणी असलेल्या पिकांची निवड आणि योग्य नियोजन केल्यास अल्पभूधारक शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. गजानन पवार यांचा हा प्रयोग हेच सिद्ध करतो.