Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; हवामान बदलांमुळे नागरिक चिंतेत
Maharashtra Weather : राज्यात हवामानात मोठे चढ-उतार दिसून येत असून, फेब्रुवारीच्या पूर्वार्धातच तापमान चाळीशी पार गेले आहे. साधारणतः होळीच्या सणानंतर उन्हाचा तीव्र प्रभाव जाणवतो, मात्र यंदा महिनाभर आधीच उष्णतेची लाट जाणवत आहे. रविवारी राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण तयार झाले, संध्याकाळी आकाशात ढगांची गर्दी होती, पण पाऊस पडला नाही.
वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा
हवामान विभागाने येत्या २४ तासांत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हवामानात सातत्याने बदल होत आहेत. तापमान काही ठिकाणी कमी झाले असले, तरी उष्णतेच्या झळा अधिक जाणवत आहेत.
किनारपट्टी भागांत पावसाची शक्यता
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील भागात वाऱ्याचा दबाव वाढल्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समुद्रातील तापमान आणि हवेच्या दाबातील बदल यामुळे या भागात वादळी पाऊस आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेचा कहर
विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सातत्याने वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
कोकणातही वाढता तापमानाचा प्रभाव
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत देखील तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. यामुळे उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असून, नागरिकांना उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेचा प्रभाव वाढला
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून, हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. याठिकाणी दमट हवामानामुळे उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात.
हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याने अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे उन्हाळा अधिक उग्र होण्याची शक्यता असून, नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत, असे सांगण्यात आले आहे.
देशभरातील हवामान बदल
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात हवामान बदलांच्या तिव्रता वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे उत्तरेकडील पर्वतीय भागांत हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीचा अंदाज
- उत्तराखंडच्या काही भागात गारपीट आणि हलक्या बर्फवृष्टीची शक्यता
- तीन मार्चला हिमाचल प्रदेशातील काही भागात प्रचंड हिमवृष्टीचा इशारा
देशभर हवामान बदलांच्या वेगवेगळ्या स्थिती दिसत असून, उत्तरेकडील पर्वतीय भागांत हिमवृष्टी, तर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.