14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात खरंच पाऊस पडणार का? निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणतात...
Maharashtra Rain : आता कुठे महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागलीये. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढणार अशी शक्यता आहे. यंदा दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये चांगला जोरदार पाऊस झाला.
यामुळे थंडीचे आगमन देखील उशिराने झाले. दिवाळीच्या काळात झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता याच संदर्भात निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी मोठी माहिती दिली आहे.
विदर्भातील 11 जिल्हे अन खान्देश वगळता महाराष्ट्रातील उर्वरित भागात दि.१४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तर नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज खुळे यांनी यावेळी दिला आहे.
अर्थातच कोकण, खानदेश वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पासून पुढील चार दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि झालाच तर तुरळ ठिकाणी अगदीच नगण्य अशा किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी फारशी काळजी करण्याची आवश्यकता वाटत नाही असे दिसते. खुळे यांनी सांगितलेल्या या भागांमध्ये पुढील तीन-चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याने थंडीचा जोर कमी राहणार आहे.
हे तीन दिवस या भागांमध्ये थंडीला विश्रांती राहील असा अंदाज खुळे यांनी दिला आहे. जाणवणारा हा वातावरणीय परिणाम विशेषकरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यातच अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक या जिल्ह्यात हा वातावरणीय बदल दिसणार नाही असे सुद्धा खुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी 17 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा थंडीसाठी परिस्थिती पूर्ववत होईल, पुन्हा थंडीला सुरुवात होणार असे म्हटले आहे.
एकंदरीत 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे आणि झालाच तर किरकोळ पाऊस होईल असा अंदाज आहे. अर्थातच या काळात फार मोठा पाऊस होणार नाही. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी चिंता काहीही करण्याची गरज नसल्याचे दिसते.