महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस पाऊस अन ढगाळ हवामान राहील, पण ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा कडाक्याची थंडी
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. कर्नाटक मध्ये देखील या चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळाला आणि कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली.
दरम्यान, या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरही दिसून आला राज्यातील अनेक भागांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली.
मात्र असे असले तरी महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा फारच मोठा काही परिणाम दिसून आला नाही अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा हलका पाऊस झालाय. मात्र असे असले तरी आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसाचीच शक्यता राहणार आहे.
राज्यात जवळपास शनिवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 7 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असे मत हवामान खात्यातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे रविवार 7 डिसेंबर 2024 पर्यंत केवळ ढगाळलेलेच राहणार असे बोलले जात आहे.
तसेच जर झालाच तर सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यात व लगतच्या परिसरात अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे असा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच, सोमवारपासून म्हणजे दि. ८ डिसेंबर पासून महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण निवळून, हळूहळू पुन्हा थंडीला सुरवात होण्याची शक्यता आहे असेही हवामान खात्यातील तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
सोमवार दि. ८ ते शुक्रवार दि. १३ डिसेंबर पर्यंतच्या पाच दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात किमान तापमान हे पुन्हा १० ते १२ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घसरू शकतो, असं म्हटलं जात आहे. यामुळे आता हवामान खात्यातील तज्ञांचा हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.