आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! सोमवारपासून थंडीला सुरवात होणार
Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि यामुळे थंडीचा जोर कमी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आज आणि उद्या राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता कायम आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असून सोमवारपासून हवामान कोरडे होईल आणि त्यानंतर थंडीचा जोर हळूहळू वाढेल असेही हवामान खात्यातील तज्ञांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
आय एम डी मधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार पर्यंत म्हणजेच आज आणि उद्या राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि किंचित ठिकाणी अगदीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता जाणवत आहे.
हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केले आहे. ढगाळ हवामानामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे कांदा समवेतच रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतो.
यासोबतच फळबागांना देखील या वातावरणाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. बंगालच्या उपसागरात तयार झालेले फेंगल चक्रीवादळ आता सोमालयाकडे निघून गेले आहे.
या चक्रीवादळाचा तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात मोठा प्रभाव पाहायला मिळाला. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
त्यानुसार महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे राज्यात खूप काही मोठा पाऊस झाला नाही. हवामान खात्याने वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे राज्यात कुठेच मोठा पाऊस झाला नाही अगदीच तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.
नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आणि काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक होती त्यामुळे तेथील शेती पिकांचे नुकसान झाले. आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
परंतु राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारपासून मात्र या भागातील हवामान देखील कोरडे होणार आहे आणि थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.