Maharashtra News: मुंबई-गोवा प्रवासाचा नवा अध्याय… आता रस्ता किंवा रेल्वे नाही, थेट समुद्रमार्ग!
Maharashtra News:- मुंबई ते गोवा हा मार्ग प्रवासप्रेमी आणि पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, सततची दुरवस्था आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर 10 ते 12 तासांचा वेळ लागत असून, कोकण रेल्वेने गेल्यास साधारण 8 ते 9 तासांचा प्रवास करावा लागतो. सततची गर्दी, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि वेळखाऊ प्रवासामुळे अनेक प्रवासी त्रस्त आहेत. मात्र, आता या अडचणींवर तोडगा म्हणून मुंबई-गोवा प्रवासासाठी नवीन आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे – तो म्हणजे समुद्रमार्गे प्रवास!
मुंबई गोवा प्रवास होईल 6 तासात पूर्ण
लवकरच मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे आणि तोही थेट समुद्रमार्गे. एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून ‘रो-रो’ बोट सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेअंतर्गत प्रवासी जहाज मुंबईतील माजगाव बंदर येथून सुटेल आणि गोव्यातील मुरगाव बंदर येथे पोहोचेल. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा 60 प्रवाशांची क्षमता असलेल्या जहाजाद्वारे सुरू केली जाईल. या सेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. जलमार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई आणि गोवा यांच्यातील प्रवास अधिक सोपा, वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
समुद्रमार्गे प्रवासाचे अनेक फायदे
समुद्रमार्गे प्रवासाचे अनेक फायदे आहेत. पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे वेगवान आणि ट्रॅफिकमुक्त प्रवास. महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी हा जलमार्ग अधिक सुटसुटीत आणि आरामदायी अनुभव देईल. दुसरा मोठा फायदा म्हणजे प्रवासादरम्यान समुद्र सफरीचा आनंद घेता येईल. अथांग सागर आणि निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्याची संधी या प्रवासात प्रवाशांना मिळेल. याशिवाय, हा पर्याय इंधन बचत आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरेल. या जलवाहतुकीमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण अधिक सुलभ होईल आणि पर्यटनासाठी नवे क्षितिज खुले होईल.
मुंबई आणि गोवा ही दोन्ही राज्ये देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. या नवीन जलमार्गामुळे गेटवे ऑफ इंडिया, माजगाव बंदर आणि गोव्यातील मुरगाव बंदर यांसारखी ठिकाणे अधिक प्रसिद्ध होतील. याशिवाय, क्रूझ टूरिझमलाही मोठी चालना मिळेल आणि कोकण किनारपट्टीवर नव्या पर्यटन संधी उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. जलमार्गाची अधिकृत सुरुवात कधी होईल याची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही, मात्र या नव्या वाहतूक सेवेमुळे पर्यटक आणि प्रवाशांसाठी एक वेगळा आणि रोमांचक अनुभव लवकरच उपलब्ध होणार आहे.