Heatwave Alert: महाराष्ट्रात उन्हाचा कहर! उन्हाळ्याची सुरुवातच भयंकर.. एप्रिल आणि मे मध्ये तापमान किती उंचावेल? तज्ञांचा भयंकर अंदाज
Maharashtra Havaman:- महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे. उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिक हैराण झाले असून, सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील कमाल तापमानाचा आलेख पुढील काही दिवस वाढता राहण्याची शक्यता आहे. उन्हाळा हंगाम सुरू होताच तापमान झपाट्याने वाढू लागले असून, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत उन्हामुळे रस्त्यांवर चहलपहल कमी झाली असून नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगत आहेत.
मंगळवारी देशातील एकूण तापमान
मंगळवारी (ता. ४) आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे देशातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातील सोलापूरसह जेऊर, परभणी, अकोला, चंद्रपूर या शहरांमध्येही तापमान ३८ अंशांवर पोहोचले. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, ब्रह्मपुरी, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी होत आहे, तर नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरातच राहणे पसंत करत आहेत. काही ठिकाणी दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे, मात्र तरीही कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याने रात्रीही उकाडा जाणवत आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या कमाल तापमानातील वाढ येत्या काही दिवसांपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचा जोर वाढल्याने विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तापमान वाढत असल्याने हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, गरम आणि जड आहार टाळावा, तसेच सैलसर आणि हलके कपडे घालावेत. उष्णतेचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि हृदय व रक्तदाबाचे रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
मंगळवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेल्या तापमानानुसार, पुण्यात ३७.७ अंश, साताऱ्यात ३७.५ अंश, सांगलीत ३७.९ अंश, परभणीमध्ये ३८ अंश, अकोल्यात ३८.६ अंश, चंद्रपूरमध्ये ३८ अंश, नागपूरमध्ये ३६.९ अंश, वर्ध्यात ३७.७ अंश, गडचिरोलीत ३७.२ अंश, तर कोल्हापुरात ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील कमाल तापमान ३८.६ अंश, मराठवाड्यात ३८ अंश, पश्चिम महाराष्ट्रात ३८.९ अंश, उत्तर महाराष्ट्रात ३६.३ अंश तर कोकणातील सरासरी तापमान ३५.३ अंश इतके आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाचा तडाखा
राज्यातील अनेक भागांत उन्हाचा तडाखा वाढल्याने जनजीवन प्रभावित झाले असून उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनही सतर्क झाले आहे. काही ठिकाणी उन्हामुळे जनावरांवरही परिणाम होऊ लागला असून, ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी व मजूरवर्ग उन्हाच्या झळांमुळे त्रस्त होत असून, शेतात दिवसा काम करणे कठीण जात आहे. उन्हाळ्याच्या झळांपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी दैनंदिन वेळापत्रक बदलले आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
सध्याच्या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने पुरेशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडूनही गरज असल्यास उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. पुढील काही दिवस उन्हाचा प्रकोप कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.