Maharashtra Havaman: शेतकऱ्यांनो सतर्क! आधी जबरदस्त उष्णता, नंतर वादळी वारे आणि पाऊस
Maharashtra Havaman:- सध्या मराठवाड्यात तापमान सतत वाढत असून 36-37 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमान आणखी 2 ते 3 अंश सेल्सियसने वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबई, कोकणपट्टी, तसेच विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर या भागांत उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली गेली आहे.
विशेषतः मराठवाड्यात 14 ते 20 मार्च 2025 दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा प्रभाव दिसू शकतो. या बदलत्या हवामानामुळे कमाल तापमान सरासरीएवढे किंवा त्यापेक्षा थोडे कमी राहील, तर किमान तापमान मात्र सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी सल्ला दिला आहे.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी सल्ला
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी आणि गहू पिकांची काढणी आणि मळणी त्वरित करून, मळलेला माल उन्हात वाळवून सुरक्षित साठवावा. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसल्यास झिंक फॉस्फाईड, गूळ, गव्हाचा भरडा आणि थोडेसे गोडतेल यांचे मिश्रण तयार करून उंदराच्या बिळांमध्ये टाकून बिळे बंद करावीत. तापमानवाढ आणि कोरड्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, मका पिकाला आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
उशिरा पेरणी झालेल्या मक्यासाठी सल्ला
उशीरा पेरणी झालेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टीन बेन्झोऐट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशा पद्धतीने फवारणी करावी आणि काढणीस तयार झालेल्या मक्याची त्वरित काढणी करून घ्यावी.
उन्हाळी भुईमूग पिकाच्या योग्य वाढीसाठी आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. या पिकावर रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास, इमिडाक्लोप्रिड 18.8% 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फळबागांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला
फळबागांचे संरक्षण देखील अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तापमानवाढ आणि बाष्पोत्सर्जनाच्या वाढत्या वेगामुळे, केळी बागेत पुरेशा प्रमाणात पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आणि तापमान संतुलित राहण्यासाठी, केळी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करणे गरजेचे आहे.
नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी सावली द्यावी. आंबा बागेतही पाणी व्यवस्थापन योग्यप्रकारे करावे आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नव्याने लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांना उन्हापासून वाचवण्यासाठी सावली द्यावी.
जर आंबा बागेत फळगळ जाणवत असेल, तर त्याच्या नियंत्रणासाठी 00:52:34 एक किलो आणि जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची वेळेवर काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी.
या बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना करून आपल्या शेतीचे आणि पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी आणि संभाव्य वादळी वाऱ्यांचा प्रभाव टाळण्यासाठी शेतीतील पाणी व्यवस्थापन आणि फवारणीच्या सल्ल्यांचे पालन करणे आवश्यक आहे.