Maharashtra Havaman Today: महाराष्ट्रात भयंकर उकाडा! हवामान विभागाचा ‘या’ भागासाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी
Maharashtra Havaman Today:- महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून तापमानाचा पारा झपाट्याने चढत आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विशेषतः विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून, हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत गुजरातमधील राजकोट येथे देशातील उच्चांकी ४१.१ अंश तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील या भागात तापमानाचा उच्चांक
महाराष्ट्रातही अकोलासह सोलापूर, ब्रह्मपुरी आणि सांगली येथे तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. तसेच, जेऊर, जळगाव, परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचले. पुणे, धुळे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास असल्याने उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. विशेषतः, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, राज्याच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये १४ ते २४ अंशांपर्यंत तफावत कायम आहे. उन्हाचा तीव्र मारा वाढल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवत आहे.
आज कसे राहील कमाल तापमान?
आज (ता. ११) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान सरासरीपेक्षा अधिक उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज असून, विदर्भातील अकोला येथे उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या इतर भागांतही तापमान वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा विचार करता पुण्यात कमाल ३७.५ अंश, जळगावमध्ये ३८.२ अंश,
सोलापुरात ३९.४ अंश, सांगलीत ३९ अंश, नागपुरात ३८.२ अंश, चंद्रपूरमध्ये ३८ अंश, कोल्हापुरात ३६.५ अंश आणि महाबळेश्वरमध्ये ३३.२ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण विभागातील सांताक्रूझमध्ये ३५.४ अंश, डहाणूमध्ये ३५.२ अंश आणि रत्नागिरीत ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात कमाल तापमान ३९.५ अंश तर किमान १७ अंश राहिले आहे. मराठवाड्यात कमाल ३८.५ अंश, पश्चिम महाराष्ट्रात ३९.४ अंश आणि उत्तर महाराष्ट्रात ३८.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. कोकणात मात्र तापमान तुलनेने कमी असून, कमाल ३५.४ अंश राहिले आहे.
या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेल्या भागांमध्ये अकोल्याचा समावेश असून, उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले असून, विशेषतः अकोला (३९.५ अंश), सोलापूर (३९.४ अंश),
ब्रह्मपुरी (३९.४ अंश), सांगली (३९ अंश), परभणी (कृषी) (३८.५ अंश), जेऊर (३८.५ अंश), जळगाव (३८.२ अंश), नागपूर (३८.२ अंश) आणि चंद्रपूर (३८ अंश) येथे प्रचंड उष्णतेची नोंद झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, भरपूर पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.