Maharashtra Havaman Today: सावध राहा! महाराष्ट्राच्या अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा धोका
Maharashtra Havaman Today:- राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून, अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढले आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने आज (ता. १०) मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. सिंधुदुर्गात तापमान सरासरीपेक्षा अधिक उष्ण व दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उर्वरित भागातही उन्हाची तीव्रता कायम राहणार असून, तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी कसे होते तापमान?
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत देशातील सर्वाधिक तापमान आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे ३९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. महाराष्ट्रात सोलापूर पाठोपाठ अकोला येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय जेऊर, सांगली, सातारा, पुणे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि नागपूर येथेही कमाल तापमान ३८ अंशांच्या वर पोहोचले. धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि वाशीम या ठिकाणीही तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले. कमाल तापमानाच्या वाढीमुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे.
किमान तापमानातही वाढ
किमान तापमानातही वाढ होत असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या विविध भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात १४ ते २४ अंशांपर्यंत तफावत होती, यामुळे रात्री व पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा उष्णता असह्य होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, विशेषतः कोकण विभागात उष्ण लाटेचा प्रभाव राहील.
राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
राज्यातील काही प्रमुख शहरांतील तापमान पाहता, पुणे येथे कमाल ३८ अंश आणि किमान १४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सोलापूरमध्ये कमाल तापमान ३९.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, किमान तापमान १९.२ अंश राहिले. अकोलामध्ये ३९ अंश, नागपूरमध्ये ३८ अंश, सांगलीमध्ये ३८.५ अंश, साताऱ्यात ३८.२ अंश, ब्रह्मपुरीत ३८.७ अंश आणि चंद्रपूरमध्ये ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कोकण विभागात सांताक्रूझमध्ये ३५.४ अंश, डहाणूमध्ये ३५.२ अंश, रत्नागिरीत ३३.५ अंश, तर महाबळेश्वरमध्ये ३२.८ अंश तापमानाची नोंद झाली.
विभागनिहाय सरासरी तापमान पाहता, विदर्भात कमाल तापमान ३९ अंश, मराठवाड्यात ३७.९ अंश, पश्चिम महाराष्ट्रात ३९.१ अंश, उत्तर महाराष्ट्रात ३७.५ अंश तर कोकणात ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथे उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करावे. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी हलका आणि सैलसर कपडे घालावेत तसेच लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.