IMD चा मोठा अलर्ट! मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात उष्णतेचा कहर…आरोग्यसंबंधी महत्वाचे निर्देश जारी
Maharashtra Havaman:- संपूर्ण महाराष्ट्रात तापमान झपाट्याने वाढत असून, उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बुधवारी राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, सांगली, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि धाराशिवसह अनेक ठिकाणी तापमानाच्या पाऱ्याने चढती कमान गाठली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते १२ मार्चदरम्यान महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवेल, विशेषतः मुंबई महानगर प्रदेशात तापमान मोठ्या प्रमाणावर वाढेल. पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत आहे, ज्याचा सर्वाधिक परिणाम कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात दिसून येत आहे.
राज्यातील अनेक भागात तापमान 37 अंशाच्या पुढे
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीच मुंबईला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला होता आणि आता मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. यामध्ये विशेषतः पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण या भागांत पारा ४० अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतही तापमान ३९ अंशांपर्यंत जाऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवार ते मंगळवार दरम्यान उष्णतेची तीव्रता अधिक राहील आणि दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा सहन करण्यास कठीण जाण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी थेट उन्हात जाणे टाळावे, पुरेसा पाणीप्रवाह राखावा आणि हलके, सुती कपडे घालावे. उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त व्यक्तींनी अधिक सतर्क राहावे.
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा प्रभाव वाढत असून, महाराष्ट्रातील विविध भागांत उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. पुण्यात ३६ अंश, सांगलीत ३७.९ अंश, रत्नागिरीत ३७.५ अंश, कोल्हापुरात ३७.१ अंश, साताऱ्यात ३६.२ अंश आणि धाराशिव येथे ३६.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आगामी काही दिवसांत उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होतील, त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या बदलांवर लक्ष ठेवून आवश्यक ती काळजी घ्यावी. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका असल्याने भरपूर पाणी पिणे, थंड पदार्थांचे सेवन करणे आणि गरम हवेमध्ये अनावश्यक बाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रचंड उष्णतेमुळे शेतीतील पिके वाया जाण्याची भीती असून, विशेषतः उन्हाळी पिके आणि फळबागा यावर मोठा परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि आवश्यक तेथे सिंचनाची सोय करावी. हवामान विभाग सतत तापमानवाढीचा अंदाज वर्तवत असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांमध्ये विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.