IMD चा मोठा अंदाज! वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार? सावध राहा!.. नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
Maharashtra Havaman:- भारतीय हवामान खात्याने (IMD) आगामी 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरतील, असा इशारा जारी केला आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार सरी पडतील.
मागील काही दिवसांपासून राजधानीतील वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे. पहाटेच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे तापमानात घट झाली आहे. हवामान विभागानुसार, केवळ पाऊसच नव्हे, तर जोरदार वादळी वाऱ्यांचाही इशारा देण्यात आला आहे. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना प्रशासनाने दिल्या सूचना
हवामानातील या बदलांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, झाडे उन्मळून पडण्याच्या घटना आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काही भागांत गारपीट होण्याचीही शक्यता असल्याने शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, वाऱ्याचा वेग अधिक असल्याने उंच इमारतींवरील फलक, झाडे आणि इतर हलक्या गोष्टी उडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
एक मार्चपासून तापमान वाढण्याचा अंदाज
दुसरीकडे, 1 मार्चपासून देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीसह उत्तर भारतात हळूहळू उन्हाच्या तीव्रतेत वाढ होईल. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकणात उन्हाचा जबरदस्त तडाखा बसला असून, तापमान झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारा प्रचंड उकाडा यंदा फेब्रुवारीतच जाणवायला लागला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, समुद्राच्या तापमानात झालेल्या बदलांमुळे हा प्रभाव दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील हवामान
मुंबईसह कोकण परिसरात तापमानाने 35 अंशांच्या पुढे मजल मारली आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुरेसे पाणी प्यावे, दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे आणि थेट उन्हाच्या संपर्कात येण्यापासून स्वतःला वाचवावे, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. वातावरणातील हे बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, मार्च महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.