महाराष्ट्रातील ‘या’ कुटुंबाला 4 एकर शेतजमीन मोफत मिळणार ! कोणती आहे ही योजना, कसा करावा लागतो अर्ज ?
Maharashtra Government Scheme : महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जात आहेत. जे लोक भूमी आहे त्यांच्यासाठी देखील शासन योजना राबवते. भूमिहीन लोकांना शासनाकडून 100% अनुदानावर शेतजमीन देखील उपलब्ध करून दिली जात आहे.
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबवली जात असून या अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील भूमिहीन कुटुंबाला मोफत शेतजमीन दिली जाते. म्हणजेच लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर या योजनेअंतर्गत शेतजमीन मिळते.
पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दोन एकर बागायती किंवा मग चार एकर जिरायती जमीन दिली जाते. मात्र या योजनेअंतर्गत दिली जाणारी जमीन लाभार्थ्यांना स्वतः कसावी लागते. लाभार्थी ही जमीन कुठेच विकू शकत नाहीत. ही जमीन भाडेपट्ट्यावर देखील देता येत नाही.
जमिनीचे वाटप झाल्यानंतर लाभार्थ्याला स्वतः या जमिनीत शेती करावी लागते. या योजनेसाठी समाज कल्याण विभाग स्वतः जमिनीची खरेदी करते आणि जमीन खरेदी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे वाटप करत असते. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून जमिन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जे जमीन मालक जिरायत जमीन कमाल पाच लाख रुपये प्रतीएकर व बागायत जमीन कमाल आठ लाख रुपये प्रती एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, त्यांनी जमिनीच्या 7/12 व आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण, कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेसाठी जे पात्र असतील त्या पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा असेही आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान आता आपण या योजनेसाठी शासनाने कोणते निकष लावून दिले आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
काय आहेत पात्रता
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लाभार्थी अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील असावा. म्हणजे याचा लाभ फक्त आणि फक्त एससी कॅटेगिरी मधील लोकांना होतो. एससी कॅटेगिरी मधील जे कुटुंब दारिद्र्यरेषेखाली येते त्यालाच याचा लाभ मिळतो.
लाभार्थी कुटुंबप्रमुखाचे वय हे 60 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. पण कुटुंबप्रमुखाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याच्या पत्नीला याचा लाभ घेता येईल. ज्या गावात विक्रीसाठी जमीन उपलब्ध असेल त्याच गावातील लाभार्थ्याला याचा लाभ दिला जातो.
ज्या गावात जमीन विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड होईल. जर त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसेल तर मग लगतच्या गावातील लाभार्थ्यांची निवड होईल.