Lasun Lagvad: ‘हा’ शेतकरी बनला लसूण सम्राट! 7 एकर लसूण शेतीतून 20 लाखांचा नफा… तुम्हीही हे तंत्र अवलंबा आणि कमवा लाखो
Farmer Success Story:- शेती हा व्यवसाय तोट्याचा ठरू शकतो, असे अनेक शेतकरी मानतात, पण काही जिद्दी शेतकरी मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती उभारतात. बुंदेलखंडमधील सागर जिल्ह्यातील ज्ञानेश्वर रावत यांनी २७ वर्षांपूर्वी लसूण लागवड सुरू केली आणि सातत्याने नफा कमावत शेतीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. पारंपरिक गहू आणि हरभऱ्याच्या शेतीपेक्षा लसूण शेतीत दुप्पट ते चौपट जास्त नफा मिळतो, हे ओळखून त्यांनी संपूर्ण लक्ष या पिकावर केंद्रित केले. गेल्या हंगामात त्यांनी ७ एकर क्षेत्रात लसूण लागवड केली आणि तब्बल २० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला.
लसूण लागवडीची सुरुवात
ज्ञानेश्वर रावत यांनी ५० किलो लसणाच्या बियाण्यांपासून शेतीची सुरुवात केली होती. त्यांचे मोठे भाऊ कृषी विभागात सहाय्यक संचालक होते आणि त्यांनीच लसूण लागवडीचा सल्ला दिला. त्या वेळी लसणाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात नव्हती, मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि नव्या प्रयोगास सुरुवात केली. तब्बल २७ वर्षांच्या अनुभवातून त्यांना असे लक्षात आले की, योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास लसूण शेतीतून मोठा नफा कमावता येतो. विशेष म्हणजे, त्यांनी आजपर्यंत फारसा तोटा सहन केलेला नाही.
लसूण लागवडीतून नफा मिळवण्याचे तंत्र
लसूण लागवडीतून सातत्याने नफा मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करावे लागते. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्यानुसार, जर एखाद्या शेतकऱ्याकडे १० एकर जमीन असेल, तर त्याने केवळ २ एकरात लसूण लावावा आणि उर्वरित जमिनीत गहू, हरभरा किंवा मसूर यांसारखी पीक घेतली पाहिजेत. सलग तीन-चार वर्षे एकाच जमिनीत लसूण लागवड करू नये, कारण त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. जमिनीतील पोषणतत्त्वे टिकवण्यासाठी आणि उत्पादन चांगले मिळण्यासाठी वारंवार पीक बदलणे आवश्यक आहे.
लसणाचे बाजारभाव अनिश्चित असतात, त्यामुळे योग्य वेळी विक्री करणे नफा मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जर लसूण काढणीच्या वेळी बाजारभाव कमी असतील, तर सर्व उत्पादन एकाच वेळी न विकता तीन-चार टप्प्यांत विक्री करावी. मार्केटच्या चढ-उतारांचा अंदाज घेत विक्री केल्यास अधिक फायदा मिळतो. लसणाचे भाव योग्य वेळी वाढतात, त्यामुळे संयम ठेवणे आणि साठवणुकीच्या योग्य पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
लसूण शेतीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होते. लसूण शेतीमध्ये बहुतांश कामे मजुरांद्वारे केली जातात, कारण त्यासाठी यंत्रांची मदत घेता येत नाही. परिणामी, स्थानिक मजुरांना काम मिळते आणि स्थलांतर रोखले जाते. अशा प्रकारे, लसूण शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतानाच, मजुरांसाठीही उत्पन्नाचे साधन ठरते.
ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडून शिकण्यासारखे
ज्ञानेश्वर रावत यांच्या यशस्वी प्रवासातून हे स्पष्ट होते की, आधुनिक शेतीत शहाणपणाने निर्णय घेतल्यास आणि योग्य नियोजन केले, तर शेतीतूनही करोडो रुपयांची कमाई शक्य आहे. पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी वाट शोधून, योग्य पीक निवड आणि बाजारपेठेचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी मोठा नफा मिळवू शकतो. लसूण शेतीत यश मिळवण्यासाठी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.