Kesar Mango Lagwad: द्राक्ष पट्ट्यात केशर आंब्याचा प्रयोग! 6 एकर, 5 हजार झाडे आणि आता 40 लाखांचे उत्पन्न… वाचा केशर आंब्याची जादू
Farmer Success Story Nashik:- निफाड तालुक्यातील रानवड गावातील संदीप जाधव या शेतकऱ्याने अपयशाच्या छायेतून बाहेर येत शेतीत नवा प्रयोग केला आणि आज मोठे यश मिळवले आहे. पारंपरिक द्राक्ष शेती करत असताना त्यांना वारंवार नैसर्गिक संकटांचा फटका बसत होता. कधी अनियमित हवामानामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान होत होते, तर कधी बाजारातील अस्थिर दरामुळे अपेक्षित नफा मिळत नव्हता. या सततच्या आर्थिक नुकसानीमुळे ते चिंतेत होते.
केशर आंबा लागवडीकडे वळण्याचा निर्णय
शेतीत काहीतरी वेगळे करून टिकाव धरायचा असेल तर प्रयोगशीलता महत्त्वाची असल्याचे जाणून त्यांनी पारंपरिक द्राक्ष शेतीला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेतला. अनेक संशोधन आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी गुजरातमधील केशर आंबा शेतीकडे आपला मोर्चा वळवला.
महाराष्ट्रात या आंब्याला चांगली मागणी असल्याने त्यावर अधिक भर द्यायचा त्यांनी ठरवले. मोठ्या धाडसाने त्यांनी आपल्या सहा एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली आणि तब्बल आठ ते नऊ लाख रुपयांचा खर्च करून सुमारे पाच हजार केशर आंब्याची झाडे लावली. ही झाडे फळ देण्यास साधारण चार वर्षे लागतात, त्यामुळे पहिल्या काही वर्षांत त्यांना मोठ्या संयमाची परीक्षा द्यावी लागली.
चार वर्षानंतर मेहनतीला फळ
चार वर्षांनंतर त्यांच्या मेहनतीला अखेर फळ मिळाले आणि गेल्या वर्षी तब्बल १५ टन केशर आंब्याचे उत्पादन हाती आले. बाजारातील चांगल्या मागणीमुळे त्यांनी या उत्पादनावरून ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. यंदा आंब्याला अतिशय चांगला मोहर आला आहे, त्यामुळे उत्पादन पूर्वीपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
काही झाडांना आंबे मोठ्या प्रमाणात लागण्यास सुरुवात झाली आहे आणि पुढील दोन महिन्यांत आंब्यांचे संपूर्ण उत्पादन सुरू होईल. या वर्षी त्यांना सुमारे ६० ते ७० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून यावरून साधारण ३० ते ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहता अनेक शेतकरीही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.
पारंपरिक शेतीतील अडचणींना तोंड देत नवीन पिकांकडे वळण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे, हे संदीप जाधव यांच्या यशाने दाखवून दिले. आज ते केशर आंब्याच्या शेतीतून लखपती होण्याचे स्वप्न साकार करत आहेत. त्यांच्या या मेहनतीमुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श ठरत आहेत.