उन्हाळी हंगामात ज्वारीची लागवड करायची असेल तर ‘या’ वाणाची निवड करा !
Jowar Farming : उन्हाळी हंगामात ज्या शेतकऱ्यांना ज्वारीची लागवड करायची असेल त्यांच्यासाठी आजचा लेख विशेष कामाचा ठरणार आहे. आज आपण ज्वारीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्वारी हे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय उन्हाळी हंगामात देखील ज्वारी लागवड केली जाते.
मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असून उन्हाळी हंगामामध्ये ज्वारी लागवड करून चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर ज्वारीच्या सुधारित जातींची पेरणी करावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ञांनी दिला आहे. आता आपण उन्हाळी हंगामामध्ये पेरणीसाठी उपयुक्त असणाऱ्या ज्वारीच्या काही सुधारित जातींची माहिती पाहूयात.
उन्हाळी हंगामात या वाणाची पेरणी केल्यास मिळणार अधिकचे उत्पादन!
उन्हाळी ज्वारीच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण उन्हाळी ज्वारीची पेरणी नेमकी कधी करावी हे जाणून घेऊयात. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी ज्वारीच्या पेरणीची योग्य वेळ हा संक्रांतीच्या जवळपासचा मानला जातो. त्यामुळे उन्हाळी ज्वारीची पेरणी ही १५ ते २० जानेवारीच्या दरम्यान करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काही शेतकरी बांधव डिसेंबर मध्ये देखील याची पेरणी करतात पण उन्हाळी ज्वारीची पेरणी डिसेंबरमध्ये करायला नको, कारण की डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडी असते आणि थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ज्वारीची उगवण होत नाही.
तसेच जर पेरणी फेब्रुवारीच्या पुढे केली तर हे पीक जास्त तापमानात फुलोऱ्यात येते. त्यामुळे त्यात दाणेच भरत नाहीत, परिणामी उत्पादनात मोठी घट होते. उन्हाळी हंगामात पेरणीसाठी उपयुक्त ज्वारीच्या सुधारित वाणाबाबत बोलायचं झालं तर मालदांडी-३५-१, परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांची पेरणी केली जाऊ शकते.
या जातींची निवड केल्यास शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातूनही चांगले उत्पादन मिळणार आहे. पी. वी. के. ८०१ म्हणजेच परभणी श्वेता या पावसाळी हंगामात उत्पादित होणाऱ्या ज्वारीची लागवड देखील उन्हाळी हंगामामध्ये केली जाऊ शकते. परंतु उन्हाळी हंगामात या जातीची निवड केल्यास दाण्यांचा आकार हा छोटा असतो.
मात्र खरीप हंगामातील हवामान उन्हाळी हंगामामध्ये लावला तर कणसांमधील बियाण्यांची संख्या वाढत असते. म्हणजेच या जातीची लागवड ही बीजोत्पादनासाठी केली तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. उन्हाळी हंगामात या जातीपासून उत्कृष्ट बियाणे तयार करून पुढील पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना या बियाण्याचा पेरणीसाठी वापर करता येणार आहे.