अहिल्यानगरच्या शेतकऱ्याच्या पोराने दिल्ली गाजवली! गणेश ढवण यांनी मिळवली राज्यसभा इंटर्नशीप.. वाचा थक्क करणारा प्रवास
Inspirational Story:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील गणेश ढवण यांनी राज्यसभा सचिवालयाच्या ‘संशोधन इंटर्नशिप’साठी निवड होऊन ती यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांच्या या ऐतिहासिक यशाने संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संशोधन इंटर्नशिप म्हणजे काय? ती कोणाला मिळू शकते? आणि गणेश ढवण यांना ही संधी कशी मिळाली? जाणून घेऊया सविस्तर...
राज्यसभा सचिवालयाची संशोधन इंटर्नशिप म्हणजे काय?
ही २१ दिवसांची खास इंटर्नशिप आहे, ज्यामध्ये संसद आणि राज्यसभेच्या कार्यपद्धतीविषयी सखोल माहिती दिली जाते. संसदीय प्रक्रिया, विधेयकांचे सादरीकरण, प्रश्नोत्तराचा तास, खासदार निधीचे वाटप, राज्यसभेचे पोर्टल आणि संसदीय नियम यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर येथे प्रशिक्षण दिले जाते.
गणेश ढवण यांना इंटर्नशिप कशी मिळाली?
राज्यसभा सचिवालयाची इंटर्नशिप मिळवण्यासाठी राज्यसभा खासदाराची शिफारस आवश्यक असते. गणेश ढवण राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्या स्टेप फेलोशिप अंतर्गत कार्यरत होते. त्याचदरम्यान, त्यांनी गणेश यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर गणेश यांनी आपला सीव्ही पाठवला आणि मुलाखतीच्या प्रक्रियेत यशस्वी ठरले.
महाराष्ट्रातून एकमेव प्रतिनिधी
महाराष्ट्रातून फक्त गणेश ढवण यांचीच निवड झाली होती. संपूर्ण भारतभरातील दहा वेगवेगळ्या राज्यांतील ३५ विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. विशेष म्हणजे, या इंटर्नशिपमध्ये बहुतांश विद्यार्थी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची मुले होती. मात्र, गणेश हे शेतकरी कुटुंबातून आलेले एकमेव विद्यार्थी होते.
वर्षातून दोनदा मिळते संधी
ही प्रतिष्ठित इंटर्नशिप वर्षातून दोन वेळा दिली जाते. इच्छुक उमेदवारांनी राज्यसभेच्या संकेतस्थळावरील ‘नॉलेज सेंटर’ विभागात याची माहिती घ्यावी.
इंटर्नशिपसाठी कोण पात्र असते?
कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.राज्यसभा खासदाराची शिफारस असणे अनिवार्य आहे.संसदीय कामकाज, राजकारण, पत्रकारिता किंवा समाजसेवा यामध्ये रस असणे आवश्यक आहे.
इंटर्नशिपनंतर कोणत्या संधी मिळू शकतात?
देश-विदेशातील प्रतिष्ठित फेलोशिप मिळवण्याची संधी,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्ये नोकरी
खासदार, आमदार, मंत्र्यांचे स्वीय सहायक किंवा संशोधन अधिकारी म्हणून संधी
संसदीय प्रक्रियेतील तज्ज्ञ म्हणून विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळते.
उपराष्ट्रपतींसोबतचा फोटो आणि
आई-वडिलांची प्रतिक्रिया
गणेश ढवण यांच्या आई-वडिलांना त्यांच्या सत्काराचा फोटो पाठवण्यात आला. मात्र, त्यांनी फोटोतील व्यक्ती कोण आहे, हे लगेच ओळखले नाही. नंतर त्यांच्या बहिणीने फोन करून माहिती दिली. हे ऐकून आई-वडील भारावून गेले आणि आपल्या मुलाने मिळवलेले यश पाहून त्यांना अभिमान वाटला.
गणेश ढवण यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी आजच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरेल. इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही मोठी संधी मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे